अबब! ५० टक्क्यासह पॉझिटिव्हिटीत गोवा देशात पहिला! वाटोळं केलं की ह्यांनी!

यथा राजा तथा प्रजा मंत्र गोव्याला लागू

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : यथा राजा तथा प्रजा अशी एक म्हण आहे. कोरोनाच्या बाबतीत ही म्हण आपल्या गोव्याला तंतोतंत लागू पडतेय. कोरोनाची दुसरी लाट देशभरात पसरत असताना वेळीच सावध होण्याचे सोडून आपले नेते आणि प्रशासक बेजबाबदारपणे वागत राहीले. ह्याच बेजबाबदार प्रशासकांचा कित्ता जनतेने गिरवला आणि शेवटी त्याचे गंभीर परिणाम आता गोव्याला भोगावे लागताहेत. राज्यात दर दोन चाचण्यांमध्ये एक बाधीत सापडत आहे. राज्यातील टीपीआर दर 50 टक्के झालाय जो देशात इतरत्र 7 टक्के आहे. ही गती अशीच राहीली तर गोव्याचं वाटोळं होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागलीए.

आदर्श सोडाच पण बेजबाबदारपणाची पातळी गाठली

राजकारण्यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण करण्याची अपेक्षा असते. इथे आदर्श सोडाच पण अगदी शेवटपर्यंत बेजबाबदारपणाची पातळी आपल्या राज्यकर्त्यांनी गाठली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तर सुरूवातीपासूनच लॉकडाऊन हा पर्याय नाही,असा सुर आवळायला सुरूवात केली. मुळात लॉकडाऊन हा पर्याय नाही हे एकदम बरोबर पण लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठीची पूर्वतयारी जी सरकारने करायला हवी होती ती कुठे केली,असा सवाल उपस्थित केला जातो. एवढं करूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परवा एका पुलाच्या उदघाटन सोहळ्यात सामील होतात आणि तिथे गर्दी करतात याला काय म्हणावे, असा प्रश्न आता लोक विचारू लागलेत. शेवटी सगळ्या पापाचं खापर जनतेच्या माथी मारून राज्यकर्त्यांना नामानिराळे होण्याची चांगलीच सवय आहे म्हणा परंतु राज्यकर्त्यांच्या या बेजबाबदारपणाचे गंभीर परिणाम आता राज्याला भोगावे लागताहेत हे मात्र खरे.

कसं काय आटोक्यात आणणार ?

राज्यातील सक्रिय रूग्णांचा आकडा झपाट्याने वाढतोय. हा आकडा आता 20 हजारांच्या पार गेलाय. दरदिवशी चाचण्यांचे प्रमाण वाढवलंय ही चांगली गोष्ट असली तरी या चाचण्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोक बाधीत सापडत आहेत. ही टक्केवारी 51 टक्के असून राष्ट्रीय स्तरावरील ही टक्केवारी फक्त 7 टक्के आहे. सगळ्याचबाबतीत गोवा हे देशातील अव्वल राज्य असं म्हणून मिरवण्याची सवय आपल्या राज्यकर्त्यांना जडली आहे. आता देशातील ही सर्वोत्तम टीपीआर टक्केवारी रेटचे मोठेपण या राज्यकर्त्यांनाच जायला नको का,असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरीक करीत आहेत. आजारातून बरे होण्याचे प्रमाण 74.96 टक्के आहे. त्यात आणखीन सुधारणा होण्याची गरज आहे. राज्यात सगळीकडेच भितीचे वातावरण पसरलंय आणि त्यामुळे लोकांना नेमके काय करावे हेच कळत नाही. यातूनच गोंधळ उडतो आणि रूग्णांची प्रक्रृती अधिक ढासळत असल्याचेही समोर आलंय.

पालिका निवडणुकांतून प्रसाराला गती

राज्यात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव सुरू असतानाच नगरपालिका निवडणुकांचा प्रचार तेजीत सुरू होता. या निवडणूकांचा निकाल लागला खरा परंतु आता कोरोना संसर्ग आपला निकाल लावण्यास सज्ज झालाय. ठिकठिकाणी निवडून आलेले नगरसेवकच आता कोरोनाबाधीत झाल्याचे प्रकार उघडकीस येताहेत. सहजिकच या नगरसेवकांसोबत प्रचारात सक्रिय असलेल्यांना आता चाचणी करून घ्यावी लागणार आहे आणि त्यातून कितीजण बाधीत म्हणून सापडतात हे देखील तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. सर्वसामान्य लोकांना या संकटकाळात कुणीच वाली राहीलेला नाही,अशी परिस्थिती आहे. सध्या कुठेच वशिला लागत नाही तसेच कुणीच कुणाला दाद देत नसल्याचे चित्र असून सर्वसामान्य घटकांची मात्र कुचंबणा सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!