गोवा प्रदेश काँग्रेसला महासचिव, सचिवांकडूनही ‘घरचा आहेर’

पक्षात पुन्हा दुफळी; धोरणांबाबत प्रश्नचिन्ह

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांच्यासह काँग्रेसचे काही नेते तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असतानाच फालेरो समर्थक नेत्यांकडून पक्षाला ‘घरचा आहेर’ देण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी आग्नेल फर्नांडिस आणि यतीश नाईक यांनी पक्षाच्या धोरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे महासचिव मारियो पिंटो आणि सचिव विजय पै यांनीही आरोपबाजी केल्याने प्रदेश काँग्रेसमधील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

पक्षाकडून ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांवर अन्याय

मारियो पिंटो आणि विजय पै यांनी पत्रकारांशी बोलताना कोणत्याही नेत्याचे नाव न घेता पक्षाकडून ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे आमदार असलेल्या प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो या ज्येष्ठ नेत्यांना दूर ढकलण्यात आले आहे. कोणताही निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही. इतर पक्षाच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेताना निष्ठावंतांना विचारात घेतले जात नाही. जे जिंकू शकतात अशांना जाणीवपूर्वक सडत ठेवले आहे, तर हरणार्‍यांना मात्र मोठमोठ्या जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून प्रदेश काँग्रेस समितीची  बैठकच झालेली नाही. या बैठकीत पदाधिकार्‍यांची नाराजी समोर येऊ नये, ती श्रेष्ठींपर्यंत पोहोचू नये, यासाठीच पद्धतशीरपणे बैठका बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या २८ वर्षांपासून आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अनेक प्रदेशाध्यक्ष आपण पाहिले आहेत. पण, आता निर्णय कोण घेते तेच आम्हाला समजेनासे झाले आहे, अशी खंत विजय पै यांनी व्यक्त केली. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍याला किंमत राहिलेली नाही, असे पिंटो म्हणाले.

समिती सदस्यांवरून टीका

अखिल भारतीय काँग्रेसने निवडणुकीसाठी ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत, त्या समित्यांतील काहींचा पक्षाशी संबंधच नाही. तर काहींनी अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्यालयही पाहिलेले नाही. समिती सदस्यांची नेमणूक करताना पदाधिकार्‍यांची बैठकही घेतली गेली नाही, असे विजय पै यांनी सांगितले.

गिरीश म्हणतात, ‘नो कमेंट्स’! 

प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडून पक्षाच्या धोरणांबाबत आवाज उठवला जात असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत आपल्याला या विषयावर काहीच बोलायचे नसल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही

सध्या जे पक्षांतर्गत चालले आहे ते पाहिल्यास काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही, असं गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव विजय पै म्हणाले.

प्रदेश काँग्रेसची अवस्था रेल्वेसारखी

प्रदेश काँग्रेसची अवस्था रेल्वेसारखी झाली आहे. कोणीही येऊन या रेल्वेत बसत आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेसचे महासचिव मारियो पिंटो म्हणालेत.

गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी झटावे

गोव्यात भाजपला हरवण्यासाठी आणि गोमंतकीयांच्या स्वप्नांची व आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी झटावे, अशी इच्छा राहुल गांधींनी व्यक्त केल्याचं ट्वीट दिनेश गुंडू राव यांनी केलं आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!