काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात? इच्छुक नेत्यांची दिल्लीत परेड

राहुल गांधीसोबत गोवा काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात सत्ताधारी भाजपसह इतर सगळ्याच राजकीय पक्षांची निवडणुकीसाठीची लगबग सुरू झालीय. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस मात्र अंतर्गत हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांनी गुरफटत चाललाय. पक्षाला प्रदेशाध्यक्ष निवडण्यात अजूनही यश मिळालेले नाही. ह्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदाचा निकाल लावण्यासाठी श्रेष्ठींनी सर्वंच प्रमुख नेत्यांना दिल्लीत पाचारण केलंय. पक्षाचे आमदार, खासदार आणि प्रभारी प्रदेशाध्यक्ष दिल्लीत पोहचले असून पुढील काही दिवसांत महत्वाचे बदल अपेक्षित असल्याचं बोललं जातंय.

राणे, रवी अनुपस्थित

काँग्रेस पक्षाचे विधानसभेत पाच आमदार आहेत. यापैकी सर्वांत ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे आणि दुसरे माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक हे दिल्लीत गेले नाहीत. प्रतापसिंग राणे हे स्वतः प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीत. त्यांचे पुत्र विश्वजित राणे हे भाजपचे नेते असून ते सरकारात मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्यावर भाजपने यापूर्वीच मोहीनी टाकलीए. त्यांचे पुत्र रितेश नाईक यांनीही भाजपात प्रवेश केलाय.

रवी नाईक यांनी उघडपणे गिरीष चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर आरोप करून त्यांच्याकडे हे पद देऊ नये,असा इशारा दिलाय. काँग्रेस पक्षानेच सध्या या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना मुख्य निर्णय प्रक्रियेतून अदखलपात्र केलंय, अशी माहिती एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखून त्यांना पक्षाने आराम करण्याचा सल्ला दिल्याचेही सांगण्यात येते.

एकमेकांचे टीकाकार एकीकडे

नवी दिल्लीत दाखल झालेल्या नेत्यांत माजी मुख्यमंत्री तथा नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, माजी उपमुख्यमंत्री एड. रमाकांत खलप, लोकसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो आणि प्रभारी प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांचा समावेश आहे. सार्दिन यांनी उघडपणे गिरीश चोडणकर यांच्यावर शरसंधान करून त्यांच्यामुळेत पक्ष पिछाडीवर येत असल्याचा आरोप केला होता.

आलेक्स रेजिनाल्ड यांचेही चोडणकर आणि कामत यांच्याशी पटत नाहीए. एवढे करूनही हे नेते दिल्लीत एकत्र आलेत. काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडु राव आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणू गोपाल राव यांचीही बैठकीला उपस्थिती होती. राहुल गांधी यांच्याशी या सर्वांची महत्वाची बैठक झाल्याची खबर आहे. आता या बैठकीत नेमके काय ठरले हे मात्र समजू शकले नाही. राहुल गांधी यांनी या सर्वांना वैयक्तीक भेट देऊन त्यांची मते जाणून घेतल्याचीही खबर आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!