अरे देवा! गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट देशापेक्षाही जास्त

गोव्यातील कोविड मृत्यूदर भयंकर; ३ दिवसांत ६० रुग्णांचा मृत्यू

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजीः कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक देशात पाहायला मिळाला. तब्बल तीन लाखापेक्षा जास्त रुग्ण २४ तासांत देशाच्या वेगवेगळ्या भागात आढळून आलेत. गोव्याबाबतही एक चिंताजनक बाब समोर आली आहे. ही बाब आहे पॉझिटिव्हिटी रेटची..

३ दिवसांत ६० रुग्णांचा मृत्यू

देशात गुरुवारी जी रुग्णवाढ झाली आहे, ती भयंकर शब्दालाही लाजवेल अशी आहे. तब्बल ३ लाख १४ हजार ८३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी देशात २ हजारपेक्षा जास्त रुग्ण दगावले आहे. गेल्या २४ तासांत संपूर्ण देशात २ हजार १०४ रुग्ण दगावलेत. त्यामुळे संपूर्ण देशातील एकूण मृतांचा आकडा हा आता १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचला आहे. जर ही रुग्णवाढ आणि मृत्यूदर आटोक्यत आला नाही, तर लवकरच देशातील एकूण मृतांचा आकडा पुढच्या दहा ते १२ दिवसांत २ लाखाचा टप्पा ओलांडेल अशी भीती व्यक्त केली जाते आहे. दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे जे देशपातळीवर घडतंय, ते गोव्यातही घडतंय. गोव्यात गेल्या ३ दिवसांत तब्बल ६० रुग्ण दगावलेत. म्हणजे सरासरी २० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर येतेय.

हेही वाचाः CORONA VACCINATION | मी घेतली, तुम्ही कधी घेताय?

गोव्यातील कोविड मृत्यूदर भयंकर

देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ इतक्या एक्टीव्ह केसेस आहेत. तर गोव्यात ९ हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. आता गोव्यासाठी सर्वाच चिंताजनक बाब आहे ती म्हणजे गोव्याचा पॉझिटिव्हीटी रेट.. आतापर्यंतचा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट सध्या गोव्यात आहे. हा रेट आहे तब्बल ३७ टक्के. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येण्याचं प्रमाण. म्हणजेच एखाद्यानं टेस्ट केली तर त्याला कोरोना संसर्ग झालेल्या असण्याची शक्यता ही तब्बल ३७ टक्के इतकी जास्त आहे. 19 एप्रिलला केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलेल्या आकडेवारीवर जर नजर टाकलीस तर १२ दिवसांत देशाचा पॉझिटिव्हिटी रेट हा दुप्पट झाला. आधी भारताचा पॉझिटिव्हिटी रेट हा ८-९ टक्क्याच्या मध्ये होते. आता तो वाढून १६ टक्क्याच्या वर गेलाय. तर गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तर देशाच्या पॉझिटिव्हिटी रेटच्या दुप्पटपेक्षाही जास्त आहे. ही सगळ्यात चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आता गोव्यात कडक निर्बंधही लावण्यात आले आहे. देशाप्रमाणेच गोव्यातही मृत्यूदर वाढतोय. गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर मृत्यूदर किती भयंकर पद्धतीनं वाढलाय, याची कल्पना करता येईल.

हेही वाचाः बापरे ! कोविड मृतांचा आकडा पुन्हा वाढला

आतापर्यंत राज्यात ९४३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

आतापर्यंत ९४३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू गोव्यात झाला आहे. जर मृत्यूदराचा हा वेग असाच सुरू राहिला, तर हा आकडा लवकरच १ हजाराचा टप्पा ओलांडेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. चिंताजनक बाब म्हणजे या नव्या कोरोनाच्या संसर्गाची सगळ्यात जास्त भीती ही तरुणांना असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच म्हटलंय.

हेही वाचाः गोव्याचा 29% कोविड पॉझिटिव्हीटी रेट धोकादायक – रोहन खंवटे

भीक मागा, उधार घ्या किंवा चोरी, पण ऑक्सिजन द्याच

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी, मृत्यदर आटोक्यात आणण्याची चिंता, आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज, या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा. महाराष्ट्रात ऑक्सिजन टँकच्या गळतीनं मोठी दुर्घटना घडली. व्हेंटिलेटवर असलेल्या २० हून अधिकजणांना तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर आता दिल्ली कोर्टानंही ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारला सुनावलंय. भीक मागा, उधार घ्या किंवा चोरी, पण ऑक्सिजन द्याच, असं म्हणत केंद्र सरकारला दिल्ली हायकोर्टानं झापलंय.

हेही वाचाः ‘भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्याच’

आरोग्य यंत्रणेची परवड

दुसरीकडे केंद्रानं रेमडिसिविरचा कोणत्या राज्याला किती पुरवठा करायचा, ऑक्सिजनचं वितरण कसं करणार, या सगळ्या गोष्टींवर उलट सुलट वाद सुरू झालेले आहेत. एकंदरीत पाहता, सध्या देशात सुरू असलेला राजकारण आणि, आरोग्य यंत्रणेची मधल्यामधे होत असलेली परवड, यापासून लांब राहून प्रत्येकानं खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जातेय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!