…तर हा पक्ष देऊ शकतो भाजपला राज्यात पर्याय

भाजपकडून काँग्रेसला पोखरण्याचे काम, 55 टक्के मतदार आहेत नाराज, विरोधकांची परिस्थिती बिकट

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात 2017 च्या निवडणुकीत फक्त 13 जागांवर विजय प्राप्त केलेल्या भाजपने (BJP) विधानसभेतील सर्वांत मोठ्या काँग्रेस (Congress) पक्षाला मागे टाकून सत्तेवर डाव मांडला देखील. एवढेच नव्हे तर आजच्या घडीला पक्षाचे संख्याबळ 27 वर पोहोचले आहे. या व्यतिरिक्त अपक्ष आमदार गोविंद गावडे (Govind Gaude) हे सरकारात मंत्री आहेत. अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांचाही सरकारला पाठिंबा आहे. हा आकडा तब्बल 40 जागांपैकी 30 वर पोहोचतो. भाजपकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे तरीही काहीजण म्हणतात पुढील निवडणुकीत भाजपचे दहा आमदार देखील निवडून येणार नाहीत. पण भाजप सत्तेवर नसेल तर दुसरा कोणता पक्ष सत्तेवर असेल, या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.
आजपर्यंत काँग्रेसने देशात आणि राज्यातही सर्वाधिक काळ सत्ता भोगली. काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहण्यासाठी भाजपला बरेच परिश्रम घ्यावे लागले. संघटनात्मक बळ पणाला लावावे लागले. एवढे करून आत्ता कुठे 2014 मध्ये भाजपला यश मिळाले. इतकी वर्षे काँग्रेसचे सगळे डावपेच, रणनिती, कुरघोड्या भाजपने शिकून घेतल्या आहेत. आजच्या घडीला ह्याच कुरघोड्यांच्या आधारावर भाजप जिथे शक्य असेल तिथे काँग्रेसला पोखरत आहे.

काँग्रेसला मात्र भलतीच आशा
भाजपला कंटाळून लोक आपल्याला निवडतील, अशी आशा बाळगून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काम करीत आहेत. किंबहुना या मानसिकतेतून त्यांना सत्ता लवकर मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसते. जोपर्यंत लोकांच्या आणि विशेष करून मतदारांच्या मनात विश्वासाचे नाते विरोधकांकडून तयार केले जात नाही तोपर्यंत भाजपला सत्तेपासून रोखणे खूपच अवघड आहे, हे कुणीही सांगू शकेल.
राज्यात अलीकडेच प्रुडंट मीडियाने राज्यातील एकूणच राजकीय वातावरणाचा अंदाज घेणारे एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाची मोठ्या प्रमाणात बदनामी केली गेली. अर्थात या सर्वेक्षणात आपले बिंग फुटेल याची भीती असलेल्यांनीच हे खटाटोप केले असतील याबाबत शंका नाही. तरीही सर्वसाधारणत: जे लोक बोलतात त्याचे मतांमध्ये परिवर्तन होणे शक्य नाही, हेच या सर्वेक्षणाने दाखवून दिले. भाजपाबाबत 55 टक्के नाराज आहेत पण म्हणून त्याचा फायदा विरोधकांना होईल हा अंदाज या सर्वेक्षणाने नाकारला. भाजपच्या मतांची टक्केवारी तशीच शाबूत आहे. लोक भाजपला दोष देतील, टीका करतील, शिव्याशाप सुद्धा करतील पण दुसऱ्या कुणाला मत देणार नाहीत, असेच यातून दिसून येते. मग केवळ पत्रकार परिषदा घेऊन आणि मोठ मोठी सनसनाटी पत्रके जारी करून काँग्रेसला सत्ता मिळणार आहे काय?

गोवा फॉरवर्ड, अपक्ष आमदार रोहन खवंटे, मगोचे एकमेव आमदार सुदिन ढवळीकर हे आपल्यापरीने सरकारविरोधात वेगवेगळे मुद्दे लावून धरत आहेत. परंतु पक्षाचा विस्तार किंवा जनतेशी थेट संवादासाठी त्यांच्याकडून कोणताच पुढाकार घेतला जात असल्याचे दिसून येत नाही. विरोधकांची ही अशी परिस्थिती असेल तर मग भाजपला पर्याय म्हणून जनता या पक्षांकडे का म्हणून पाहणार? या एकूणच परिस्थितीत ‘आम आदमी पार्टी’ (Aam Aadmi Party) मात्र कोणताही गाजावाजा न करता काम करीत आहे. अलीकडे पक्षाने बरीच आघाडी घेतली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे विषय हाताळणे, करोनाच्या काळात वेगवेगळे उपक्रम राबवणे तसेच दिल्लीतील विकासकामांची माहिती गोमंतकीयांना देऊन आपल्या कार्यपद्धतीबाबत येथील लोकांना परिचित करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स (Elvis Gomes) यांना आता प्रत्यक्ष फिल्डवर पाठवण्यासाठी राहुल म्हांबरे यांच्याकडे निमंत्रकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणात आम आदमी पक्षाकडे लोक आकर्षित होत असल्याचे निष्कर्ष आढळून आले आहेत.
काँग्रेसचा पारंपारिक अल्पसंख्याक मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. काँग्रेसने त्यांचा भ्रमनिरास केला आहे आणि त्यामुळे त्यांना योग्य पर्याय हवा आहे. आम आदमी पार्टीकडून त्यांना हा विश्वास मिळत असल्याचेही दिसून येते. काँग्रेसने ताबडतोब स्वत:त सुधारणा घडवून आणली नाही तर त्यांचे काही खरे नाही, हे निश्चित.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!