पोलिसांवर गोळीबार, कोलवाळ जेलमधील कैद्याचे पलायन

म्हापसा जिल्हा इस्पितळबाहेर फिल्मी स्टाईल पलायन, सुदैवाने पोलिस सुखरूप

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: कोलवाळ जेलमधील कैदी विवेक कुमार गौतम उर्फ आर्यन याने पोलिसांना हातावर तुरी देऊन पलायन केलं. म्हापसा जिल्हा इस्पितळाबाहेर हा प्रकार घडला. या घटनेनं राज्यभर खळबळ माजलीय. विवेक कुमार गौतम हा खडणीच्या गुन्ह्यातील आरोपी होता. खटला सुरु असताना विवेक कुमार गौतमने पलायन केल्यानं पोलिसांची झोप उडालीय.

पोलिसांवर गोळीबार, पण सुदैवाने…

आरोपी विवेक कुमार गौतमने बरं वाटत नसल्याचं सांगितल्याने पोलिसांनी त्याला तपासणीसाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात आणलं होतं. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणलं असताना विवेकच्या दोन साथिदारांनी पोलिसांवर गोळीबार केला. सुदैवाने गोळीबार चुकवण्यात पोलिसांना यश आलं. मात्र यासगळ्या घडामोडीत विवेक पोलिसांच्या तावडीतून निसटला. विवेकच्या दोन साथिदारांनी पोलिसांवर मिरची पुडही फेकली.

जेलमध्ये कैद्यांकडे मोबाइलचा सर्रास वापर

कोलवाळ जेलमधून यापूर्वी कित्येकदा कुख्यात आरोपींनी पलायन केलेलं आहे. कोलवाळ जेलचा प्रशासकीय कारभार हा अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलाय. जेलमध्ये कैद्यांकडे सर्रांस मोबाईलचा वापर केला जातो हेही सिद्ध झालंय. जेल प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन कैद्यांची मनमानी सुरु असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. विवेक कुमार गौतम हा जिल्हा इस्पितळात येत आहे हे आधीच समजल्याने त्याचे दोन साथिदार म्हापसा जिल्हा इस्पितळाबाहेर दबा धरुन बसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या सगळ्यात गोवा पोलिसांची मोठी नाचक्की झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.