राष्ट्रीय युवा संसदेत गोव्याला स्वतंत्र प्रतिनिधित्व

राज्य युवा संसद स्पर्धेत स्वाती मिश्राची बाजी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाच्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून प्रतिनिधित्व मिळण्यावर शिक्कामोर्तब झालंय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केंद्रीय क्रीडामंत्री आणि नेहरू युवा केंद्राकडे संपर्क साधून गोव्याची बाजू भक्कमपणे मांडली. गोवा हे स्वतंत्र राज्य आहे आणि गोव्याची एक वेगळी ओळख असल्याने गोव्यातील युवकांना राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळायलाच हवे, असे पटवून दिल्यानंतर अखेर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

युवकांच्या प्रतिभेची कसोटी

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय विविध राज्यांतील नेहरू युवा केंद्रांच्या मार्फत युवा संसद स्पर्धा भरवते. या स्पर्धांतून जिल्हा प्रतिनिधी आणि त्यांच्यातून राज्य प्रतिनिधीची निवड केली जाते. राज्य प्रतिनिधींना अंतिम स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि नवी दिल्लीत सेंट्रल हॉलमध्ये भाषण करण्याची संधी मिळते. उर्वरित जिल्हा प्रतिनिधींना युवा महोत्सवात सहभागी करून घेतले जाते. या स्पर्धेतील पहिले तीन विजेते निवडले जातात आणि त्यांना रोख बक्षिसे दिली जातात.

स्वाती मिश्रा करणार गोव्याचं प्रतिनिधित्व

यंदाच्या राज्य युवा संसद स्पर्धेत स्वाती मिश्रा हिने बाजी मारलीय. तिची राष्ट्रीय स्तरावरील युवा संसदेत गोव्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालीय. या व्यतिरिक्त उत्तरेतून प्रियंका कदम आणि दक्षिणेतून प्रेम कुमार यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने त्यांनाही युवा संसदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कृष्णा पालयेकर यांच्या प्रयत्नांना यश

गत साली राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात गोव्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी पेडणे तालुक्यातील युवक कृष्णा पालयेकर याला मिळाली होती. त्याने गोव्यावरील या अन्यायाबाबत केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासमोर ही गोष्ट मांडली होती. राठोड यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन गोव्यावरील हा अन्याय दूर करू, असे वचन दिले होते. यावर्षी अखेर गोव्याला स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळाल्याने त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!