गोव्याला कौशल्य विकास संस्थांची गरज…

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : राज्यात कुशल मनुष्यबळ विकसित होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्याला विविध क्षेत्रात कौशल्य विकास संस्थांची गरज आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संचालनालयाला केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर कौशल्य विकासातही सुधारणा करण्याचा सरकार विचार करीत आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

एफएसडीसी उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते

फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएसएआय) गोवा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने फर्मागुडी फोंडा येथे सुरू केलेल्या एफएसएआयच्या कौशल्य विकास केंद्राच्या (एफएसडीसी) उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

नवीन भारत घडविण्याची हाक दिली

आयआयटी, एनआयटी, जीआयएम, बीआयटीएस पिलानी आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मदतीने राज्याच्या मनुष्यबळाचा कुशल मनुष्यबळात विकास करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, त्यासाठी समिती स्थापन केली जाईल. राज्याच्या मनुष्यबळाचा भविष्यकालीन कौशल्य विकास आवश्यक आहे असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी नवीन भारत घडविण्याची हाक दिली आहे ज्यासाठी भविष्यकालीन शिक्षणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सरकार एकटे काहीही करू शकत नाही असे त्यांनी सांगितले आणि त्यांनी लोकांकडून आणि संस्थांकडून सहकार्य मागितले.

राज्यात कुशल मनुष्यबळ विकसित होणार

पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी गोवा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे असे सांगितले. एफएसएआय आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे राज्यात कुशल मनुष्यबळ मिळेल. याआधी राष्ट्रीय प्लंबिंग संस्थांपैकी एकाशी करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. नजीकच्या भविष्यात राष्ट्रीय बांधकाम संस्थांसोबत आणखी एक सामंजस्य करार केला जाईल असे ते म्हणाले. या सामंजस्य करारांमुळे राज्यात कुशल मनुष्यबळ विकसित होईल असे ते म्हणाले. कौशल्य विकास मंत्रालयाच्या अंतर्गत गोवा सरकारने प्रमाणित केलेल्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनद्वारे अभ्यासक्रमांना प्रमाणपत्र दिले जाईल असे ते म्हणाले.

गोवा हे ३६५ दिवसांचे पर्यटन स्थळ

मुख्यमंत्र्यांनी एफएसएआयला एफएसडीसीमार्फत राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याचा सल्ला दिला. अग्निशमन आणि आपत्कालीन खात्यात या प्रकारचे सरकारमान्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार सरकार करील. त्यासाठी भविष्यात भरती नियमातही बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री नीलेश काब्राल यांनी राज्याच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी संघ म्हणून काम केले पाहिजे. गोवा हे विकसनशील राज्य असून अर्थव्यवस्थेचा भार पर्यटनावर आहे असे ते म्हणाले. गोवा हे ३६५ दिवसांचे पर्यटन स्थळ आहे आणि हॉटेल आणि इतर ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते पुरेसे सुरक्षित आहेत याची आम्ही खात्री केली पाहिजे. सर्वांच्या पाठिंब्याने आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ असे श्री काब्राल म्हणाले.

केंद्र निश्‍चितपणे स्वतःचा ठसा उमटवेल

तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विवेक कामत यांनी, सामान्यत: अग्निशमन आणि सुरक्षा क्षेत्रात सर्व प्रयत्न पोस्ट फॅक्टो कृतींवर केंद्रित असतात. परंतु या क्षेत्रात हे कौशल्य विकास केंद्र सुरू केल्याने तांत्रिक मनुष्यबळ विकसित केले जाईल ज्यामुळे आग आणि सुरक्षा समस्या टाळता येतील आणि एक प्रकारे सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित समस्यांना हातभार लागेल असेही ते म्हणाले. हे केंद्र निश्‍चितपणे स्वतःचा ठसा उमटवेल आणि नजीकच्या काळात आमच्याकडे केवळ गोवा राज्य आणि देशासाठीच नव्हे तर जगभरातील अग्निशमन आणि सुरक्षा क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक असतील असे डॉ. कामत म्हणाले.

सामंजस्य कराराची केली देवाणघेवाण

एफएसएआय, ओ आणि जी उध्योग (फायर) चे अध्यक्ष मुकेश शाह यांनी एएएजी, शाह भोगीलाल जेठालाल आणि ब्रदर्स यांच्यावतीने एफएसएआयच्या कौशल्य विकास केंद्रासाठी देणगी म्हणून रु. ५ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. प्राचार्य आणि प्राध्यापक, ETC GEC, डॉ राजेश लोहानी आणि राष्ट्रीय अध्यक्ष, FSAI, श्री अजित राघवन यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली.

एफएसएआय सुरक्षा निर्देशांक जर्नलचे प्रकाशन

एफएसएआयचे अध्यक्ष डॉ जेनिफर लुईस, एफएसएआयचे राष्ट्रीय सचिव श्री अशोक मेनन आणि एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित राघवन यांची यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एफएसएआय सुरक्षा निर्देशांक जर्नलचे प्रकाशनही करण्यात आले. डॉ. राजेश लोहानी यांनी स्वागत केले तर प्राध्यापक डॉ. गणेश हेगडे यांनी आभार मानले. एफएसएआयचे कोषाध्यक्ष जोविता लॉरेन्सो यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!