खाणी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घ्यावी!

शेखर नाईक | प्रतिनिधी
फोंडा : खाणी सुरू करणं सर्वस्वी राज्य सरकारच्या हातात आहे. केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असूनही खाणी सुरू करण्यास ते अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी खाणी सुरू करण्याबाबत कणखर भूमिका घ्यावी, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटनं केली.
फोंडा इथं झालेल्या पत्रकार परिषदेत गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते आक्रमक झाले. यावेळी फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर (Puti Gaokar), बालाजी गावस, रवी देसाई आदी उपस्थित होते. राज्य सरकारला खाणी सुरू करणे शक्य नसल्यास खाण अवलंबितांना सरकारी सेवेत सामावून घ्या, अशी मागणी करण्यात आली. केंद्र तसेच राज्यात भाजपचं सरकार असूनही खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत का निर्णय घेतला जात नाही, या विषयी मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली.
खाण अवलंबित संकटात आहेत. खाणी सुरू करणं सरकारला शक्य नसेल, तर अवलंबितांची यंत्रसामग्री, ट्रक, बार्जेस ताब्यात घेऊन त्यांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर त्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावं, अशी मागणी करण्यात आली.