‘गोवा माईल्स’विरोधात उद्रेक! टॅक्सीचालकाला हणजूणमध्ये बदडले

दोघा टॅक्सीचालकांना अटक केल्यानं संतापाची लाट

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : हणजूण येथे प्रवासी भाडे घेऊन आलेल्या गोवा माईल्स अ‍ॅप टॅक्सीसेवेच्या चालकाला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी मंगलदास जना पालयेकर (34, दाभोळवाडा-शापोरा) आणि रोहन रत्नाकर गवंडी (31, देऊळवाडा-पार्से) या दोघा टॅक्सीचालकांना अटक केली.

दुसरे भाडे घेतल्याने वाद

ही घटना रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी क्रोयडन फर्नांडिस (24, फातोर्डा) हा गोवा माईल्सचा टॅक्सीचालक सकाळी दाबोळी विमानतळावरून प्रवासी भाडे घेऊन बागा येथे आला होता. प्रवासी ग्राहकाला निश्चित ठिकाणी पोचविल्यानंतर तेथे त्याला आणखी एक प्रवासी भाडे मिळाले. सदर प्रवाशाला हणजूण येथील कंट्री क्लब हॉटेलजवळ पोचविले. यावेळी तेथे असलेल्या काही पर्यटक टॅक्सीचालकांनी फिर्यादीची गाडी अडवली आणि त्यास मारहाण करून धमकी दिली. याबाबत फर्नांडीस यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. शिवाय पोलिस फिर्यादीला घेऊन घटनास्थळी गेले असता त्याने दोघा संशयित ओळख पटविली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यासह इतरांविरूध्द भारतीय दंड संहितेच्या 323, 504, 506 (ii) कलमाखाली गुन्हा दाखल केला व त्यांना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीर तरल करीत आहेत.

‘गोवा माईल्स’विरोधात उद्रेक

गोवा माईल्सच्या चालकाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली दोघा टॅक्सी चालकांना पोलिसांनी अटक केली व त्यांना पोलिस स्थानकात नेऊन जबर मारहाण केल्याची वार्ता हणजूण मधील टॅक्सीवाल्यांत वार्‍या सारखी पसरली. पोलिसांच्या या कृतीबाबत पर्यटक टॅक्सीवाल्यांमध्ये संतापाची लाट पसरली. संतप्त टॅक्सीवाल्यांनी पोलिस स्थानकावर जेल भरो आंदोलन नेण्याचा पवित्रा घेतला व राज्यभरातील आपल्या सहकारी टॅक्सीवाल्यांना हणजूण पोलिस स्थानकात मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!