बापरे! गोव्यातही कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून येणार? ब्रिटनहून आलेले 10 जण पॉझिटिव्ह

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्यात एकीकडे पर्यटन सुरु आहे. अशातच राज्यातील जनतेसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये समोर आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे आधीच जगाची झोप उडाली आहे. त्यानंतर भारतानं ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरबी बंदी घातली आहे. अशातच ब्रिटनहून आलेल्या शेवटच्या दोन विमानांमधील 10 प्रवासी कोरोना पॉझिटिव आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी दहा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. महत्त्वाचं म्हणजे या 10 जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे, अशीही भीती व्यक्त केली जाते आहे. विशेष म्हणजे या सर्व दहाही जणांचे स्वॅब पुण्याला चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पुण्याच्या व्हायरोलॉजी लॅबमध्ये हे स्वॅब चाचणी पाठवण्यात आले असून लवकरच आता याबाबतची पुष्टी होण्याची शक्यता आहे.
लवकरच पुण्यातून स्वॅबचा रिपोर्ट आल्यानंतर नव्या कोरोना स्ट्रेनबाबत पुष्टी होईल, असं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे कोरोनाचा नवा स्ट्रेनचा 70 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. ब्रिटनहून आलेल्या आणि कोरोनाची लागण झालेल्या 10 रुग्णांमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेचीही झोप उडाली आहे.
#Goa #Health #Covid19 @visrane pic.twitter.com/f5Bnp148gB
— Prudent Media (@prudentgoa) December 23, 2020
31 डिसेंबरपर्यंत विमानबंदी
नव्या कोरोनास्ट्रेनमुळे ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी येत्या काळात वाढवली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र विमानबंदी आधी ब्रिटनहून आलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सर्वच्या सर्व 10 जणांना आयसेलेट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आता नेमकी काय स्थिती?
दरम्यान, बुधवारी गोमेकॉमध्ये दोघा कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील मृतांची संख्या 39 वर पोहोचली आहे. राज्यात बुधवारी 125 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 70 जण बरे झालेत. त्यामुळे राज्यातील ऍक्टीव कोरोना रुग्णांची संख्या एक हजारावर पोहोचली आहे.