गोव्याच्या दारूचं पनवेल कनेक्शन ; आठवड्यात दुसऱ्यांदा मोठी कारवाई !

सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखाली पकडली दारू ; ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

महिन्यातील अशा प्रकारची तिसरी मोठी कारवाई

देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची या महिन्यातील अशा प्रकारची तिसरी मोठी कारवाई आहे.

सहाच दिवसांपूर्वी पकडले 500 बॉक्स

सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे. गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोके तर २० मे रोजी उस्मानाबाद येथेही ४३ लाख ९३ हजार रुपये किमतीचे अवैध मद्याच्या ५७५ खोक्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!