आता सुसाट! गोवा-कोल्हापूर अंतर लवकरच 2 तासांत होणं शक्य

राज्यातून कोल्हापूरला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) ते गोवा (Goa) हे अंतर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. दोन तासांत हे अंतर पार करता येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. संकेश्वर ते बांद या राष्ट्रीय महामार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ५४८ म्हणून या मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. ६० मीटर रुंदीचा हा महामार्ग लवकरच आकाराला येण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे गोवा आणि कोल्हापूरचं अंतर कमी वेळेत आणि वेगानं पार करणं जास्त सुलभ होणार आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते अडीच वर्षात या महामार्गाच्या प्रकल्पाचं काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. तसं नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केलं जातंय. पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत या प्रकल्पासाठीचा निधी केंद्राकडून येईल, असं सांगितलं जातंय.

अखेर मुहूर्त मिळाला

संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरु होते. अखेर या प्रकल्पाला मुहूर्त मिळालाय. भारतमाला आणि सागरीमाला या केंद्राच्या योजनांमध्ये या महामार्गाला प्राधान्य देण्यात आलंय. आता या महामार्गासाठीचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. या महामार्गाला नंबर कोणता द्यायचा, ते ही ठरलंय. पुढली महिन्यात त्याचा परिपूर्ण प्रस्ताव दिल्लाला पाठवला जाणार आहे.

या मार्गावरील गती ही ताशी शंभर किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. एकूण १०८ किलोमीटरचा हा महामार्ग असेल. गडहिंग्लज मधून केवळ तासाभरात गोव्यात पोहोचता येणार आहे. मात्र आंबोली घाट असल्यानं आणखी वीस-तीस मिनिटांचा अतिरीक्त वेळ जरी पकडला तरी दीड तासांत बांद्यामध्ये पोहोचता येणारे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून हा मार्ग साकारला जात असल्याचं कळतंय.

या महामार्गामुळे नेमका कसा फायदा होणार?

वेळ आणि खर्च वाचणार
पर्यटन वाढण्यास मदत होणार
गावा-गावांतून आणि बाजारातली गर्दी टळणार
दळणवळणाला चालना मिळणार
चार पदरी मार्गामुळे वाहतूक कोंडी मिटणार
व्यवसाय वाढीस मदत होणार

मुंबई-पुणेकरांनाही फायदा

कोल्हापूर आणि गोवा अंतर कमी वेळेत पार करणं शक्य झाल्यास साहजिकच पश्चिम महाराष्ट्रासोबतच पुणे आणि मुंबईवरुन यायचं अंतर कमी होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दळणवळण वाढून पर्यटनासोबतच राज्याच्या महसुलात वाढ होईल, असं जाणकार सांगतात. येत्या काळात आता हा प्रकल्प किती वेळात पूर्ण होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!