…या गतीनं गोवा कधी होणार ‘फुल्ली व्हॅक्सीनेटेड’ ?

11 ते 12 लाखांपैकी फक्त 15 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यातल्या अठरा वर्षांपुढील एकुण लोकसंख्येपैकी 62 टक्के नागरीकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असुन यापैकी 15 टक्के नागरीकांचं दोन्ही डोसचं लसीकरण पुर्ण झालंय. दरम्यान, लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असुन दररोज सरासरी 20,000 नागरीकांचं लसीकरण होतंय, अशी माहिती साथरोग विशेषज्ञ डाॅ. राजेंद्र बोरकर यांनी दिलीय. यासंदर्भात टाईम्सऑफ इंडीयाच्या वृत्तानुसार 18 वर्षांपुढील सर्व नागरीकांच्या पहिल्या डोसचं लसीकरण 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं राज्य सरकारचं उद्दीष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि गोव्याचं अर्थकारण पूर्वपदावर आणण्याचं आव्हान पाहता गोव्यातल्या 11 ते 12 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी ही गती निश्चितच पुरेशी नसल्याचं जाणकारांचं मत आहे.

गोव्यात सध्या 46 कायमस्वरूपी लसीकरण केंद्र आहेत. याशिवाय 198 सॅटेलाईट सेंटर्स आहेत. गोव्याची लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्रांची ही संख्या पुरेशी आहे. यात वाढ करण्याचा सध्या तरी कोणता विचार नाही. एखाद्या दुर्गम भागात 50 ते 100 जण असतील तर त्यांना तिथं जाऊन लसीकरण करण्यात येतं. काही निवडक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातुन वयोवृध्द नागरीकांना घरी लसीकरणही करण्यात येतं, असंही डाॅ. बोरकर म्हणाले.

लसीकरणाबाबत गैरसमज किंवा भितीचा मुददा चर्चेत होता, मात्र त्यावरही आम्ही सातत्यानं प्रबोधनाचं काम करतोय. देशात सध्या 32 कोटींहून अधिक लोकांनी लसीकरण केलंय. याचा अर्थ आता त्याबाबत भिती किंवा गैरसमज जनतेत राहीला नसावा, असंही डाॅ. बोरकर यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच डेल्टा प्लसची टांगती तलवार आहे. केंद्र सरकारनं पर्यटन व्यवसायाला पायघड्या जरूर पसरल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटक आणि प्रवाशांसाठी गोव्याचे दरवाजे खुले केलेत. मात्र गोव्यातल्या नागरिकांचंच लसीकरण इतक्या धीम्या गतीनं होणार असेल तर या सर्वांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होवू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या घोषणा जरूर गोव्याला शक्तीवर्धक ठरतील, पण त्यासाठी ‘फुल्ली व्हॅक्सीनेटेड’ हा मेसेज केवळ जाहिरातीत नव्हे तर गोव्यातील प्रत्येक नागरिकाच्या माध्यमातून जगभरात पोहोचण्याची अत्यंत गरज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!