गोवा सरकार विदेशी नागरिक, भिकाऱ्यांनाही देणार लस !

यादी सादर करण्याची जबाबदारी तलाठी व पोलिसांवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : गोव्यात वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरीकांना कोरोना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या दृष्टीने भारतीय नागरीकत्व विना कागदपत्रे वास्तव्यास असलेल्या नेपाळी, बांग्लादेशी तसेच इतर विदेशी नागरीकांबरोबरच भिकारी लोकांची यादी सादर करण्याचे निर्देश सरकारने दिले असून ही जबाबदारी तलाठी व पोलिसांवर सोपविली आहे.

याबाबतचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी तालुकावार मामलेदारांना दिला आहे. जे विदेशी लोक नोकरीच्या निमित्ताने गोव्यात दाखल झाले आहेत, हॉटेल, स्पास कॅसिनोसह इतर आस्थापनांमध्ये कामाला आहेत व लॉकडाऊन कर्फ्यूमुळे गोव्यात अडकून पडले आहेत, या लोकांना परत मायदेशी जाण्यासाठी कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.

विना कागदपत्रे गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेले विदेशी नागरीक, शिवाय भिकारी वर्गाकडेदेखील आवश्यक कागदपत्रे नसतात. त्यामुळे या लोकांनाही कोरोनाची लस घेण्यात अडचण होत असून त्यांना लस घेणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार गोव्यात वास्तव्यास असलेल्या सर्व विदेशी नागरीक तसेच भिकारी वर्गाची माहिती मिळविण्यासाठी तालुकावार पंच किंवा नगरसेवक या स्थानिक लोकप्रतिनिधींची तसेच मदत घ्यावी व सोमवारपर्यंत अहवाल सादर करावा, असा निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी मामलेदारांना दिला आहे.

सध्या सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणासाठी आधारकार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची सक्ती करण्यात आलेली आहे. अशावेळी गोव्यात रोजगार किंवा पर्यटनासाठी आलेल्या विदेशी नागरीकांना लस द्यावी, जेणेकरून त्यांना जर कोरोनाची लागण झाली व त्यापासून होणारा संसर्ग टाळता यावा, या हेतूने सरकारने हे पाऊल उचलले आहे.

कोरोनाची लस देण्याच्या उद्देशाने गोव्यात वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरीकांची यादी सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यानुसार सर्व तलाठी यांना ही यादी सोमवारी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय तालुक्यातील पोलिसांना देखील याकामी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती बार्देशचे मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!