मनासारखे आरक्षण नसल्यामुळेच सरकारी हस्तक्षेपाचा आरोप!

नाराज भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष निशाणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नगरपालिका, पणजी महापालिका यांचं आरक्षण, प्रभाग फेररचना नगरविकास खाते ठरवत असतं. गेल्या दोन वर्षांचा आढावा घेऊनच आरक्षण निश्चित केलं जातं. यावेळीही अशीच प्रक्रिया झाली आहे. पण आरक्षण मनासारखं न झाल्यामुळेच यात सरकारी हस्तक्षेपाचा आरोप काहीजणांकडून होत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरक्षणामुळे नाराज असलेले भाजपचे सत्ताधारी नगरसेवक तसंच आमदार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. प्रुडंट वृत्तवाहिनीवर सोमवारी झालेल्या ‘हेड ऑन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

हेही वाचाः ‘स्वयंपूर्ण गोवा’ स्वप्न नव्हे सत्य – मुख्यमंत्री सावंत

आरक्षण नियमानुसारच!

पालिका तसंच मनपा निवडणुकीसाठी जाहीर झालेलं आरक्षण व फेररचनेचा भाजपच्या काही सत्ताधारी नगरसेवकांना फटका बसला. या नगरसेवकांसह त्यांचे आमदारही निराश झाले असून, आपली नाराजी ते जाहीरपणे व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना नगरविकास खात्याने जाहीर केलेलं आरक्षण नियमानुसारच आहे. एखाद्या प्रभागात गेल्यावेळी ज्या प्रवर्गाला आरक्षण मिळालं होतं, त्याच प्रवर्गाला पुढील निवडणुकीत त्याच प्रभागात आरक्षण मिळत नसतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची केंद्र सरकारच्या खातेप्रमुखांशी चर्चा

मुख्यमंत्री म्हणाले…

भाजपसाठी कोणतीही निवडणूक उपान्त्य लढत नसते, तर प्रत्येक निवडणूक पक्षासाठी अंतिम लढतच असते आणि ती जिंकण्यासाठी पक्ष मैदानात उतरतो. आगामी पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यात भाजपची पॅनेल्स असतील आणि ती निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सुरू असलेले सर्वच विकास प्रकल्प, दहा हजार नोकऱ्या पूर्ण करूनच आपण आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहे. त्यामुळे राज्यात मुदतपूर्वी विधानसभा निवडणूक होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रशासनात सध्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे दहा हजार नोकऱ्यांची पदं तत्काळ भरणं आवश्यक आहे. त्यासाठीच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध होतील आणि पदंही भरली जातील. मुख्यमंत्री या नात्याने आपण राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेनेही आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. हे लक्षात घेऊनच एक वर्ष अगोदरच भाजपने आगामी विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

गोव्याचा विकास करणार

दरम्यान, गोवा मुक्तीचा हीरक महोत्सवी कार्यक्रम साजरे करण्यासाठी आपण केंद्राकडे शंभर कोटी मागितले होते. पण, त्यासंदर्भात केंद्राला जे पत्र लिहिलं होतं, त्यात मोठ्या प्रकल्पांची माहिती दिली होती. केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर विकासात्मक प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधीची गरज असल्याचंही आपण म्हटलं होतं. याचा विचार करूनच केंद्रातील भाजप सरकारने गोव्याला तीनशे कोटी दिले. या तीनशे कोटींतील शंभर कोटी पंचायती आणि पालिकांना देण्यात आलेत. आता उर्वरित निधी स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठीच खर्च करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अहंकार नसल्यामुळेच काही निर्णय मागे

मी मुख्यमंत्री असलो तरी माणूसही आहे. प्रत्येक माणसाकडून चुका होतच असतात. आपले काही निर्णय चुकीचे आहेत, त्याचा जनतेला फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यानंतर आपण तत्काळ असे निर्णय मागे घेतले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा अहंकार असता, तर मीच घेतलेले निर्णय मी स्वत:हून मागे घेतले नसते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

हेही वाचाः मुख्यमंत्री म्हणतात, कोळसा हाताळणी कमी करणार पण RTIनं समोर आणलं धक्कादायक वास्तव

‘स्वयंपूर्ण गोवा’ निवडणूक घोषणा नव्हे!

आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहीम निवडणुकीची घोषणा नाही, तर ते वास्तव आहे. सद्यस्थितीत गोव्याला स्वयंपूर्ण होण्याची नितांत गरज आहे, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. आमदार असल्यापासून आपण स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न पाहत होतो. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण तत्काळ ही मोहीम हाती घेतली, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

सरकारचा अहवाल केंद्राला जातो!

केंद्रातील मोदी सरकार देशातील ज्या राज्यात भाजप सरकार आहे, त्या सरकारकडून वार्षिक अहवाल घेत असते. त्याच पद्धतीने राज्यातील भाजप सरकार, सरकारातील मंत्र्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे आहे. भाजपचे सर्वच आमदार विकासाची विचारधारा घेऊन पुढे जात आहेत. त्याचा जनतेला मोठा फायदा होत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!