गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादीची युतीबाबत काँग्रेसला डेडलाईन!

१७ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास वेगळा विचार करण्याचे संकेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला युतीसाठी १७ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. युतीला आणखी वेळ झाल्यास त्याचा फटका तिन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसने १७ सप्टेंबरपर्यंत युतीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केल्यास आम्हाला पुढील निर्णय घेता येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गुरुवारी स्पष्ट केलं.

हेही वाचाः मातृभाषेमुळंच मुलांचा सर्वांगीण विकास : सिद्धेश नाईक

विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधणं आवश्यक

राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधणं आवश्यक आहे. तशी प्रतिक्रिया जनतेतूनही उमटत असल्याचा दावा करीत विजय सरदेसाई वर्षभरापासून विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी इच्छुक आहेत. पण काँग्रेसने युतीसंदर्भात अजूनही ठाम निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत गोवा फॉरवर्डशी मिळतीजुळती भूमिका घेतली.

शेवटच्या क्षणी युती झाली नाही

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत युतीसाठी इच्छुक होते. पण, शेवटच्या क्षणी युती झाली नाही. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. त्यावेळी युती झाली असती तर काँग्रेसने निश्चित सरकार स्थापन केलं असतं. त्यावेळी केलेली चूक यावेळी टाळायची असेल तर काँग्रेसने १७ सप्टेंबरपर्यंत युतीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. निवडणूक जवळ येत असल्यानं राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्ड तयारीला लागले आहेत. अशावेळी युतीचं धोरण निश्चित झाल्यास तयारीस आणखी गती मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस आता अधिक वेळ वाट बघण्यास तयार नाही, असे पटेल म्हणाले. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशीही आपली या विषयावर चर्चा झाली आहे. त्यांनीही तीन पक्षांच्या आघाडीसाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे काँग्रेसने लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला पाहिजे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास भाजपचा पराभव करणं निश्चित शक्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचाः SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेशी सहमतः सरदेसाई

दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांनी आघाडी करावी, असं गोमंतकीय जनतेचं मत आहे. त्यामुळेच आपण वर्षभरापासून आघाडीसाठी प्रयत्न करीत आहे. पण, काँग्रेसकडून त्यासंदर्भात निर्णय घेतला जात नाही. युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमत आहे. काँग्रेसने १७ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेतला तर आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल, असं विजय सरदेसाई यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः संजीवनीच्या कामगारांना यंदा मिळणार एक्स ग्रेशीया

फुटिरांच्या प्रवेशाचा निर्णय युतीवर अवलंबून

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या फुटीर आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश दिल्यास त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा करणार नसल्याचा पवित्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घेतला आहे. यावरून प्रफुल्ल पटेल यांना छेडले असता, काँग्रेससोबत युतीबाबत चर्चा होऊन आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्यास काँग्रेसची मागणी आम्ही मान्य करू. तसं न झाल्यास फुटीर आमदारांना प्रवेश देण्याबाबत आम्ही योग्य निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. फुटीर आमदारांशी राष्ट्रवादीने अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

चिदंबरम् आजपासून गाेव्यात

काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् शुक्रवारपासून तीन दिवस गोवा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात चिदंबरम काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीची चर्चा पुढे नेणार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून समजतं.

हा व्हिडिओ पहाः Breaking | Politics | Congress | काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक शुक्रवारपासून पुन्हा गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!