गोवा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष लाविनो रिबेलो यांचं निधन

कोरोनाचं निदान झाल्याने वास्कोतील एसएमआरसी हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः हणजूण कायसूंव पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य, गोवा फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व म्हापश्यातील सेंट मेरी हायस्कूलचे शारीरिक शिक्षक लाविनो रिबेलो यांचे शनिवारी रात्री निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. दिलदार, दानशूर, तत्वनिष्ठ व हसतमुख माणूस म्हणून त्यांनी ओळख होती.

हेही वाचाः गोवा शिख युवकांचा आदर्श उपक्रम

कोरोनाचे निदान

पंधरा दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर वास्को येथील एसएमआरसी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तब्येतीत सुधारणा होत असतानाच ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे रिबेलोंची प्राणज्योत मालवली.

हेही वाचाः चिंता नको, राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध

राजकीय कारकीर्द

लाविनो रिबेलो हे ग्रॅण्ड चिवार हणजूण येथील रहिवासी होते. हणजूण कायसूव पंचायतीच्या प्रभाग सातच्या पंच सदस्यपदी ते चार वेळा निवडून आले होते. गत कार्यकाळात त्यांनी आपल्या 80 वर्षीय आईसह पंच सदस्यपदी निवडून येण्याचा विक्रम केला होता. तत्कालीन पालिका मंडळात त्यांनी काही काळ सरपंचपद भुषविलं होतं. पण वैयक्तिक कारणास्तव कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा देऊन हे पद सोडलं होतं.

हेही वाचाः लोक ऐकेनात! घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी

गोवा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष

हणजूण जीमखाना क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केलं होतं. उदयोन्मुख फुटबॉलपटूंसह सर्व खेळाडूंना ते प्रोत्साहन देत असत. त्यामुळे सर्व फुटबॉलपटू त्यांचा आदर करीत असत. गोवा फुटबॉल असोसिएशनच्या यशस्वी वाटचालीत रिबेलो यांचा मोठा वाटा आहे.

हेही वाचाः औरंगाबादच्या तरुण उद्योजकाची अनोखी किमया; देशाला दिले 630 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्लांट

दानी वृत्ती असलेलं व्यक्तीमत्व

सेंट मेरीज हायस्कूलमध्येही शिक्षक म्हणून त्यांना मोठा मान होता. विद्यालयाने करोनाच्या माहामारीपूर्वी देणगी गोळा करण्याच्या हेतूने सोडत काढली होती. या सोडतमधील शेवोरलेट या आलिशान गाडीचे पहिले बक्षिस रिबेलो यांनाच लागले होते. ही गाडी त्यांनी आपल्या शाळेलाच भेट दिली होती. अशा प्रकारे त्यांची दानी वृत्ती होती. शिवाय गावातही ते सढळ हस्ते लोकांना मदत करीत असत.   

हेही वाचाः तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढली; सर्वोच्च न्यायालयाचे दिले ‘हे’ आदेश

समाजातील सर्व स्तरातून रिबेलोंच्या निधनावर हळहळ

त्यांच्या निधनाने पंचायत मंडळ, गावातील लोक, फुटबॉलशी संबंधी लोक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय लोक, हायस्कूलचे व्यवस्थापन, शिक्षक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची आई आणि दोन बहीण असा परिवार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!