गोवा ड्रग्समुक्त होऊ शकतो, पण त्यांची इच्छा आहे का?

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
पणजीः गोवा हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे राज्यात देशी तसेच विदेशी पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात भेटी ओघाने आल्याच. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व असलेल्या पर्यटन व्यवसायासोबत अनैतिक गोष्टींचाही प्रवेश झालेला आहे. देशी-विदेशी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन राज्यात अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय आदींचे प्रस्थ फोफावले आहे. यामुळे गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्यांच्या वावरही वाढत चालला आहे. राज्याची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अनैतिकतेला वाव देणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांची पाळेमुळे खणून काढणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थी तसेच युवकांना आपल्या कवेत घेऊन त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करू पाहत असलेल्या अंमली पदार्थांच्या भस्मासुराला रोखण्यासाठी सरकार तसेच विरोधकांनी एकत्र येण्याबरोबरच यंत्रणेला कारवाईचे स्वातंत्र्य देऊन त्यात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
गुन्हे शाखेकडून कारवाईचा धडाका
देशात तसेच राज्यात अंमली पदार्थ सेवन व तस्करी प्रकरणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात कारवाईचा सपाटा सुरू झाला आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत अंमली पदार्थ तस्करी व सेवन प्रकरणी कारवाईनंतर अनेक गोष्टी उघड होऊ लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) माहितीवरून तसेच अटक करण्यात आलेल्या दोघा तस्करांच्या माहितीवरून बॉलिवूड व अंमली पदार्थ समीकरणाच्या चर्चेला जोर आला आहे.
अशाच प्रकारची कारवाई सर्वत्र होणे आवश्यक आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने अशाच प्रकारे कारवाईचा धडाका लावला आहे. गुन्हा शाखेने १५ ऑगस्ट रोजी गाववाडी-हणजूण येथील एका व्हिलात रंगलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून कपिल झवेरी या अभिनेत्यासह चार जणांना अटक करून ८ लाख ४६ हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर गुन्हा शाखेने या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी दोघा संशयितांना अटक केली.
तुर्कस्तानचा माजी कमांडो गैरव्यवहारात
या व्यतिरिक्त गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ७ फेब्रुवारी रोजी खालचावाडा – हरमल येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून तुर्कस्तानी आर्मीचा माजी कमांडो मुरात तास याला अटक केली होती. त्याच्याकडून पथकाने ७१ लाख रुपये किमतीचा ७१० ग्रॅम एमडीएमए हा अंमली पदार्थ जप्त केला होता. या प्रकरणी पथकाने अधिक चौकशी केली असता, त्यात आणखी संशयित सहभागी असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पथकाने या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता, यात आंतरराज्य टोळी सहभागी असल्याची माहिती समोर आली. या अनुषंगाने अधिक तपास करताना गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कर्नाटक पोलिसांच्या बंगळुरू गुन्हा शाखेच्या साह्याने आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करून तुर्कस्तानी कमांडोचे दोघे साथीदार मोहम्मद फईज आणि राशिद या मूळ केरळ आणि बंगळुरू येथे राहणाऱ्या संशयितांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून ५ लाख रुपये किमतीचे ३० ग्रॅम एमडीएमए आणि एलएसडी जप्त केले आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात विशेषकरून किनारी भागात फोफावत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यवसायाला राजाश्रय असल्याचे आरोप नजीकच्या काळात झालेले आहेत. यामुळे या अनैतिक व्यवसायापासून मुक्तीसाठी विशेषकरून किनारी भागातील नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे, आणि कारवाईसाठी पोलिस यंत्रणेला पूर्ण स्वातंत्र्य देणे तितकेच आवश्यक आहे.