गोव्याच्या मातीत वेगळीच जादू, गोवन वार्तामुळे ऋणानुबंध दृढ होतील!

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : गोव्यासारखंच कोकण सुंदर असूनही कोकणात गोव्याइतकं पर्यटन बहरलं नाही. याचं कारण म्हणजे गोव्याच्या मातीत असलेली आगळी जादू आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केलं.
गोवन वार्ता लाईव्ह या गोव्यातील पहिल्या मराठी महाचॅनलचं लोकार्पण शुक्रवारी, धनत्रयोदशीला दिमाखात पार पडलं. हा वैभवशाली सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ताज हॉटेल अँड कन्वेन्शन सेंटर, दोनापावला इथं पार पडला. त्यावेळी डॉ. पांढरपट्टे बोलत होते.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फोमेन्तो मीडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अंबर तिंबलो, महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, गोवन वार्ताचे संपादक संजय ढवळीकर आणि गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर व्यासपिठावर उपस्थित होते.
गोव्याची समृद्ध संस्कृती जगापुढे येईल!
गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचा जगाला नव्याने परिचय होईल. इथल्या विविधतेने नटलेल्या सामाजिक सौहार्दाला नवं व्यासपीठ मिळेल. मराठी आणि गोव्याची नाळ जुळलेली आहे. मीडियानं सत्य दाखवण्याच्या नादात वाहावत जाउ नये. वास्तवाच्या पलीकडचं दाखवण्याच्या अट्टाहासापोटी मीडियानं अतिरेक करू नये, असा सल्ला डॉ. पांढरपट्टे यांनी दिला.