‘जावडेकर गो बॅक’! काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी
पणजी : युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या अटकेचा निषेध करत प्रदेश काँग्रेसने (Goa Pradesh Congress) केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांच्याविरोधात पणजीत एल्गार पुकारला. काँग्रेस भवनाखाली जावडेकर यांच्या पुतळ्याचे दहन करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘जावडेकर गो बॅक’च्या घोषणाही दिल्या.
काँग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, आग्नेल फर्नांडिस, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईचा सौदा केला आहे. जावडेकर आणि राज्यातील भाजप सरकारने सत्तेसाठी म्हादई कर्नाटकला विकली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनता संकटात सापडलेली आहे. अशा परिस्थितीत जावडेकर यांना गोव्याच्या भूमीवर पाय ठेवण्याचा आणि येथील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका अमरनाथ पणजीकर यांनी केली.
म्हादई, मोले प्रश्नावरून जावडेकर यांनी गोव्यात येताच गोमंतकीयांची माफी मागायला हवी होती. म्हादईबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. पण शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. हिंमत असेल तर आयआयटी प्रकल्पावरून रस्त्यावर उतलेल्या शेळ-मेळावली, तीन प्रकल्पांवरून आंदोलन करीत असलेल्या मोले येथील शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने गोमंतकीय जनतेवर अन्याय, अत्याचार सुरू केले आहेत. त्यामुळे जनतेच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. याचे गंभीर परिणाम केंद्र आणि राज्य सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही पणजीकर यांनी दिला.
कारवाई सूडबुद्धीने : पणजीकर
प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी चोवीस तास देशभरातील जनतेच्या समस्या जाणून घ्यायला हव्या. युवा काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्याकडे म्हादईबाबत चर्चा करायला गेले होते. पण त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला. गोव्याच्या रक्षणासाठी काँग्रेस रात्रंदिवस सतर्क आहे. आम्ही रात्री झोपलो तर सरकार उरलासुरला गोवाही विकून टाकेल, असा निशाणाही त्यांनी साधला.
जावडेकरांना घेरणार : भिके
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईबाबत गोव्यावर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे काँग्रेस कदापिही शांत बसणार नाही. त्यांच्या प्रत्येक गोवा भेटीत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विजय भिके यांनी दिला. गोव्यात आल्यानंतर जावडेकरांनी विरोधकांशीही चर्चा करायला हवी होती. सरकारने त्यांचे कार्यक्रम जाणीवपूर्वक का लपवले, असा सवालही त्यांनी केला.