स्वार्थी सुदिन ढवळीकरांच्या चेल्यांच्या उपदेशाची कॉंग्रेसला गरज नाही

कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांचा पलटवार !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : स्वार्थासाठी सर्व तत्वे बासनात गुंडाळून मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केवळ सत्ता भोगण्यासाठी विविध राजकीय पक्षां सोबत संसार मांडला. कॉंग्रेसबरोबर सरकारात सहभागी होऊन सत्तेची फळे चाखली. आता सत्तेबाहेर असल्याने ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. सुदिन ढवळीकरांच्या चेल्यानी कॉंग्रेस पक्षाला उपदेश देण्याची गरज नाही, असा पलटवार कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केलाय.

आपल्या निवेदनात ते म्हणतात, कॉंग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे. सुदिन ढवळीकरांनी मंत्रीपद भुषवलेल्या सरकारातील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व दिगंबर कामत यांनी त्यांच्या कारकिर्दीत गोव्यात लोकाभिमूख सरकार चालवुन योगदान दिलेले आहे. गोमंतकीय जनतेचे हित सांभाळुनच कॉंग्रेस पक्षाने जनहिताचे निर्णय घेतले व प्रसंगी लोकांसमोर नमते घेवुन लोकभावनेचा आदर केला.

ढवळीकरांचे चेले पत्रकारांना खोटं ठरवताहेत का ?

आमचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची पक्ष निष्ठा, सचोटी व प्रामाणिकपणा हा सर्वज्ञात आहे. भाजप सरकारला मुदतवाढ द्या, असे सुचविणारे सुदिन ढवळीकरांचे वक्तव्य गोव्यातील वर्तमानपत्रांत छापुन आले होते. त्यावरच चोडणकर यांनी योग्य प्रतिक्रीया दिली होती. आता सदर वक्तव्याचा विपर्यास झाला, असे म्हणणाऱ्या ढवळीकरांच्या चेल्याना पत्रकारांना खोटारडे म्हणायचे आहे का? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.

ढवळीकरांचे पक्षप्रेम संपूर्ण गोव्याला माहीत आहे

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळुनही स्वार्थापोटी सुदिन व दीपक ढवळीकरांनी मगो पक्ष कार्यकारणीचा निर्णय झाला नसतानाच भाजपचे यु-टर्न मास्टर स्व. मनोहर पर्रिकरांची साथ धरली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या पाठीत सुरा खुपसला होता, हे संपुर्ण गोव्याला माहित आहे. यामुळे ढवळीकरांचे पक्ष प्रेम किती आहे हे स्पष्ट होते, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

आमच्या दाव्याला ढवळीकरांनीच दिली पुष्टी

गिरीश चोडणकर यांनी सुदिन ढवळीकरांना त्यांच्या भाजपकडील संबंधावर उघडे पाडले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुदिन ढवळीकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडुन डॉ. प्रमोद सावंतानी शिकावे, असा सल्ला दिल्याने आमच्या अध्यक्षानी केलेल्या दाव्याला त्यानी पुष्टीच दिली असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

ढवळीकर सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करून स्वार्थ साधतात

चांगल्या कामाची जर सुदिन ढवळीकर प्रशंसा करतात तर मग कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला १२ फेब्रुवारी २०२० रोजी कोविड महामारी हाताळण्यासाठी योग्य तयारी करा, असा सल्ला दिला होता. त्यावर ढवळीकरांनी राहुल गांधीच्या विचारांना का पाठिंबा दिला नाही, याचे उत्तर मगोच्या केंद्रीय समितीचे कार्याध्यक्ष प्रताप फडते, सहसचिव महेश पणशीकर व खजिनदर अनंत नाईक यांनी ढवळीकरांकडुन घ्यावे. प्रत्यक्षात सुदिन ढवळीकर हे सत्तेत असलेल्यांकडे नेहमीच आपली निष्ठा गहाण ठेवतात व त्यांची हुजरेगिरी करुन आपला व्यक्तिगत स्वार्थ साधतात, असेही अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

आगामी निवडणुकीत कॉँग्रेस स्वबळावर येणार सत्तेत

आता भाजप सरकारला मुदतवाढ देणे वा राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ नसुन भ्रष्ट भाजप सरकारला घरी पाठविण्याची तयारी गोमंतकीयांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणूकांत एक प्रबळ दावेदार म्हणुन कॉंग्रेस पक्ष पुढे येणार असुन, स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. गोमंतकीयांना स्वार्थी राजकारण्यांचे चेहरे आता कळले असुन पक्षाची तत्वे घेवुन गोमंतकीयांच्या हितासाठी वावरणारे कॉंग्रेसचे सरकार ते निवडून देणार आहेत, याची नोंद मगोवाल्यानी घ्यावी, असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!