‘गाय माझ्यासाठीही माता आहे, पण राज्यात बीफ खाणाऱ्यांचा विचार करणं हे तर माझं कर्तव्य’

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्यात बीफचा तुटवडा भासतो आहे. कर्नाटकने केलेल्या गोहत्याबंदी कायद्याचा परिणाम गोव्यावर होत असल्याचं दिसून येत आहे. अशा वातावरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. गोव्यात भाजपची सत्ता असल्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीनं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बीफवरुन प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बीफबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बीफवरुन भाजप दुहेरी भूमिका घेतं आहे, अशी टीका होत असताना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. मुख्यमंत्री म्हणाले की…
गायीला मीदेखील माता मानतो. पण राज्यात 30 टक्के अल्पसंख्यांक बीफचं सेवन करतात. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचाही विचार करणं हेही माझं कर्तव्य आहे. त्यामुळे बीफवरुन आम्ही कोणतीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. राज्यातील जनतेचा विचार करणं हे तर मुख्यमंत्र्यांचं कामच आहे.
गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून बीफचा पुरवठा केला जात होता. मात्र गोहत्या बंदी कायद्यामुळे गोव्यात बीफचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना बीफचा तुटवडा पडणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनीही भाजपच्या प्रभारींवर निशाणा साधला होता.
हेही वाचा – गोव्यात बीफ व्यवसायाच्या संपूर्ण आकडेवारीचे संकेत काय सांगतात?
मुळात भाजपचेही प्रभारीही कर्नाटकले आहेत. अशात कर्नाटकातील गोहत्याबंदी कायद्यानंतर त्यांनी भाजपचं गोमातेबद्दल प्रेम हे फक्त कर्नाटकापुरतंच मर्यादित आहे की काय, असाही सवाल केला होता. आता केरळ आणि इतर भागातून गोव्यात बीफ आणलं जाण्याबाबतच्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र ऐन मौसमात बीफचा तुटवडा जाणवू लागल्यानं चिंतादेखील व्यक्त करण्यात आली आहे.