‘या’ तारखेपासून गोव्यात सुरू होणार थिएटर

कॅसिनोही होणार लवकरच सुरू. गांधी जयंतीनंतर सरकार शाळा व्यवस्थापन, पालक-शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांशी चर्चा करून घेणार निर्णय.

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यातील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून सुरू होतील. कॅसिनोही (Casino) सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने ‘अनलॉक 5’ची मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जारी केली आहेत. त्यात देशभरातील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत राज्यातील चित्रपटगृहांच्या मालकांशी चर्चा करून आणि करोना प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याचे निर्देश देऊन चित्रपटगृहे सुरू केली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटकांचे आकर्षण आणि महसुलाचे स्रोत असलेले कॅसिनो सुरू करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव आलेले आहेत. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यासही काही हरकत नाही. पण त्यासाठी आणखी काही दिवस जातील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मांडवीतील कॅसिनो हे देशी-विदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. शिवाय त्यातून राज्य सरकारला आर्थिक महसूलही मिळत असतो. पण करोनामुळे मार्चपासून कॅसिनो व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असलेले कामगार, व्यावसायिक यांच्यासमोर रोजीरोटीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कॅसिनो सुरू करावे, अशी मागणीही अनेकांकडून होत आहे.

शाळांबाबत चर्चेअंतीच निर्णय
केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा-महाविद्यालयांचे नियमित वर्ग सुरू न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही ठिकाणी दहावी, बारावीचे नियमित वर्ग सुरू झाले आहेत. इतर शाळांनीही याबाबत स्वत:हून निर्णय घ्यावा. गांधी जयंतीनंतर सरकार शाळा व्यवस्थापन, पालक-शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांशी चर्चा करून यासंदर्भातील निर्णय घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!