गोव्यात ‘या’ कॅन्सरचे प्रमाण जास्त, ही खबरदारी महत्वाची

इरफान खान, ऋषी कपूर या दिग्गज अभिनेत्यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. अभिनेता संजय दत्तलाही फुफ्फुसाचा कॅन्सरचे निदान झाले आहे. गोव्यातही कॅन्सरचे प्रमाण लक्षणीय

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : कॅन्सरने लोक मरण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण वाढण्याची वेगवेगळी कारणेही आहेत. चिंतेची बाब म्हणजे कॅन्सरने तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. हल्लीच इरफान खान, ऋषी कपूर या दिग्गज अभिनेत्यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. अभिनेता संजय दत्तलाही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले आहे. गोव्यातही कॅन्सरचे प्रमाण लक्षणीय आहे.

गोव्यात वर्षाला एवढे कॅन्सर रुग्ण, ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण जास्त
गोव्याचे कॅन्सर तक्ष डॉक्टर शेखर साळकरांनी या विषयी माहिती दिली. गोव्यात वर्षाला साधारण 1 हजार 300 ते 1 हजार 500 लोकांना कॅन्सर होतो. यात सगळ्यात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी गोव्यात ब्रेस्ट कॅन्सरचे 250 ते 300 रूग्ण सापडतात. वय वर्षे 30 ते 50 या दरम्यान कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास जगण्याची शक्यता 95 टक्के असते. दुसऱ्या टप्प्यात निदान झाल्यास जगण्याची शक्यता 80 टक्के असते. तिसऱ्या टप्प्यात निदान झाल्यास जगण्याची शक्यता 50 ते 60 टक्के असते. कॅन्सरचे शेवटच्या म्हणजे चौथ्या टप्प्यात निदान झाल्यास जगण्याची शक्यता 10 टक्के असते.

सर्वसाधारण कॅन्सरपासून सावधगिरी बाळगण्यासाठी जास्तीत जास्त पालेभाज्या खाव्यात. तशेच धूम्रपान व दारूच्या व्यसनापासून दूर राहावे. आपल्या आजूबाजूच्या कॅन्सर रुग्णांमध्ये ही व्यसने सर्रास आढळतात.

ब्रेस्ट कॅन्सरसाठी महिलांनी ही घ्यावी खबरदारी
महिलांनी महिन्यातून एकदा स्वतःच स्वतःच्या स्तनांची तपासणी करावी. तशी तपासणी केल्याने कॅन्सरचे निदान लवकर होऊ शकते. निदान लवकर झाल्याने जगण्याचे प्रमाण 95 टक्के असते. 40 वर्षांवर बेसलायन मॅमोग्राफी करणे संयुक्तिक असते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील तपासणी करावी. पहिले मूल वयाच्या 30 वर्षांपूर्वी असावं. कमीत कमी दोन मुलं असावीत. कमीत कमी 6 महिने स्तनपान आवश्यक. 2 वर्षे स्तनपान केल्यास अतिउत्तम. ब्रेस्ट कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास प्राण वाचतो. लवकर निदान झाल्याने वैद्यकीय खर्चही वाचतो असे डॉक्टर शेखर साळकर यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!