गोवा बोर्डाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या

वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोवा बोर्डाने अखेर बारावी आणि दहावीच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केलीए. नव्या तारखा 15 दिवस अगोदर जाहीर केल्या जातील,असे बोर्डाने जारी केलेल्या विशेष पत्रकात म्हटलंय. राज्यात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाए.

देशात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांनी आणि खुद्द केंद्र सरकारने बारावी आणि दहावी परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्णय जाहीर केले होते. गोव्यात मात्र सरकारने शेवटपर्यंत ऑफलाईन परीक्षा घेणारच,असा हट्टा धरला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्वे जारी करून या परीक्षा घेऊन देशासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना इरादा होता. दुर्दैवाने गेल्या दोन दिवसांत नव्या कोरोना प्रकरणांनी जबरदस्त उचल खाल्ली आहे. मृतांचा आकडा विक्रमी बनत चाललाय. या परिस्थितीत विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त बनले होते. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलनही सुरू केले होते. अखेर बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जनतेच्या भावनांची कदर करून या परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली.

राज्यात 24 एप्रिलपासून बारावीच्या तर 13 मेपासून दहावीच्या परीक्षा होणार होत्या. बारावीच्या परीक्षा 8 मेपर्यंत चालणार होत्या तर दहावीच्या परीक्षा 4 जूनपर्यंत सुरू राहणार होत्या. गोवा बोर्डाचे चेअरमन भगिरथ शेटये यांनी यासंबंधीचे परिपत्रक गोवा बोर्डाच्या वेबसाईटवर टाकलेए. यासंबंधीची अधिसुचना गुरूवारी जारी केली जाईल,अशी माहितीही बोर्डाकडून देण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!