माजी आमदाराचा भाजपला घरचा अहेर! म्हणाले…

पंतप्रधानांकडे मागणी : आयात मंत्री आमदारांची घाण स्वच्छ भारत अभियानाद्वारे साफ करा!

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

म्हापसा : गोव्याच्या लोकायुक्तांनी केलेल्या शिफारशिंची मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Swant) दखल घेणार नाहीत. त्यामुळे मजूर निधी, बीच क्लीनींग घोटाळा व बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी. पक्षातील आयात मंत्री आमदारांची घाण स्वच्छ भारत अभियानाद्वारे साफ करावी, अशी मागणी थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
काणका येथे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत कांदोळकर यांनी ही माहिती दिली. बेहिशोबी मालमत्ता, मंत्री आमदारांचा भ्रष्टाचार व घोटाळे याबाबत गुन्हा नोंदवून भ्रष्टाचारविरोधी पथक किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस लोकायुक्तांनी निवृत्तीच्या अगोदर सरकारकडे केली आहे. पण मुख्यमंत्री या प्रकरणी कोणतीच कारवाई करणार नाहीत, याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच मी पंतप्रधानांनी यात लक्ष घालण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे, असे कांदोळकर यांनी सांगितले.
मजूर निधी हा 13 कोटींचा घोटाळा आहे. गरीब मजूरांच्या नावे पंच व सरकारी पक्षाच्या कार्यकत्यांना या निधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. या घोटाळ्याची एसीबीमार्फत चौकशी करावी. तसेच राजकारणी किंवा वरीष्ठ अधिकार्‍यांचा या घोटाळ्यात हात असल्यास हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करावे, अशी मागणी कांदोळकर यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!