गोवा – बेळगाव हायवेवर अडथळ्यांची मालिका सुरूच

खानापूर ते बेळगाव या टप्प्याच्या कामावर परिणाम

Goan Varta Live | प्रतिनिधी

बेळगाव : गोवा ते बेळगांव हायवे ४(अ) च्या रूंदीकरणाला एक ना अनेक अडथळ्यांची श्रृखलाच नडत चाललीय. खानापूर ते बेळगाव या टप्प्याच्या कामात आता एका नव्या आंदोलनाने शिरकाव केलाय. खानापूर येथील शेतकऱ्यांनी 6 किलोमीटरच्या याच हायवेचा भाग असलेल्या एका बगलरस्त्याला विरोध दर्शवून त्याचे काम थांबलेय. हा एकूणच हायवे 86 किलोमीटरचा आहे. ह्यात 26 किलोमीटरचा रस्ता सहा पदरी तर उर्वरीत रस्ता चौपदरी करण्यात येईल.

या हायवेच्या कामाला पहिला झटका बेळगावातील शेतकऱ्यांनी दिला. मच्छे- हलगा या 12 किलोमीटरच्या बगलरस्त्याला या शेतकऱ्यांनी हरकत घेतली. हा विषय कर्नाटक हायकोर्टमध्ये पोहचला आणि तिथून या कामाला स्थगीती देण्यात आली. यानंतर खानापूर- अनमोडचे काम गेले वर्षभर बंद आहे. या कामालाही हायकोर्टानं स्थगीती दिलीय. पर्यावरणवाद्यांनी या कामाला हरकत घेतल्यानेच हे काम रखडलंय. आता तिसरा दणका खानापूर शेतकऱ्यांनी दिलाय. या हायवेसाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची भरपाई योग्य पद्धतीनं दिली गेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने भरपाईबाबत पक्षपातीपणा केल्याचा ठपका शेतकऱ्यांनी ठेवलाय.

जोपर्यंत भरपाईचा विषय सोडवला जाणार नाही तोपर्यंत हे काम सुरू करू देणार नाही,असा निर्धारच या शेतकऱ्यांनी केलाय. एनएचएआयने भरपाईचा विषय सोडवणार असल्याचे आश्वासन दिलंय. भरपाईत पक्षपातीपणा झाल्यास त्याला योग्य पद्धतीनं न्याय देऊ,असेही शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय. आक्रमक शेतकऱ्यांची दखल घेऊन वरिष्ठ सरकारी पातळीवर शेतकऱ्यांशी संवाद साधून हा विषय सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!