जीएमसीतील नोकरभरती, करोनाच्या फैलावासाठी?

मल्टी टास्किंगच्या 85 पदांसाठी सुमारे दोनेक हजार इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. गर्दी झाल्याने जीएमसीतील रूग्णांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : जीएमसीतील कंत्राटी नोकरभरती प्रक्रियेमुळे सरकारचा निष्काळजीपणा आणि गलथान कारभार उघड झाला आहे. जीएमसीत मल्टी टास्किंगच्या 85 पदांसाठी नोकरभरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी सरकाराने जाहिरात दिली होती. या पदांसाठी इच्छुकांची सोमवारी मुलाखत होती. सोमवारी पहाटेपासून गोव्यातील वेगवेगळ्या भागातून इच्छुक उमेदवारांची जीएमसीच्या आवारत गर्दी झाली. मल्टी टास्किंगच्या 85 पदांसाठी सुमारे दोनेक हजार इच्छुक उमेदवार जमले. यावेळी कोविड 19 महामारीच्या खबरदारीचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत.

तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा
गोव्यात सर्वत्र कोविड 19चे रूग्ण मोठ्या प्रमाणांत आहेत. दिवसेंदिवस कोविड 19 महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतोय. दर दिवशी लोकांचे मृत्यूही होतात. अशा परिस्थितीत एकाचवेळी सुमारे दोन हजार लोक एकत्र आल्याने भितीचे वातावरण पसरले. गोव्यातील सर्व भागातील लोकांचा यात समावेश होता. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले गेले नाही. कित्येकांच्या तोंडाला मास्कही नव्हते. यामुळे गोव्यात कोविड 19चा फैलाव आणखी वाढला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय.

‘या पदांसाठी’ जीएमसीत नोकरभरीत
कोविड 19 महामारी हाताळण्यासाठी राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. दक्षिण गोव्यातील कोविड19साठीचे ईएसआय हॉस्पिटल, हॉस्पिसियो हॉस्पिटल, फोंड्याचे उपजिल्हा हॉस्पिटल व इतर कोविड केंद्रे अपुरी पडत आहेत. कोविड 19ची बाधा झालेल्या आणि आधीच अनेक व्याधींनी ग्रासलेल्या रूग्णांसाठी जीएमसीत काही वॉर्ड आरक्षित आहेत. या सगळ्यासाठी आणखी वैद्यकीय स्टाफची गरज आहे. त्या अनुषंगाने जीएमसीत सरकारने कंत्राटी पध्दतीवर नोकरभरती सुरू केलीय. यात 90 स्टाफ नर्स, 30 एनेस्थेशिया असिस्टंट, 6 बायो मेडिकल इंजिनीयर, 10 ज्युनियर टेक्निशियन, 5 एलडीसी आणि 85 एमटीएस पदांचा समावेश आहे.

हा जनतेच्या जिवाशी खेळ, काँग्रेसची टीका
जीएमसीत घडलेल्या प्रकारावरुन सरकार कोविड 19 महामारीच्या बाबतीत गंभीर नाही हे स्पष्ट होतंय. सरकारच नियमांचं पालन करणार नसेल तर कांय उपयोग? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकरांनी (Amarnath Panjikar) केला. कोविड 19 महामारी हाताळण्यासाठी जीएमसीत वैद्यकीय मनुष्यबळाची आवश्यकता आहे. नोकरभरतीला विरोध नाही. नियम पाळून आवश्यक खबरदारीचे उपाय घेऊन नोकरभरती केरणं गरजेच होतं. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या सरकारला जनता माफ करणार नसल्याचे पणजीकरांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!