नाजूक आर्थिक स्थिती, सुमार शिक्षण असल्यानं मुली वळताहेत वेश्या व्यवसायाकडे

'अर्ज' या संस्थेच्या अहवालातून उघड

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव: राज्यात वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या महिला आणि मुलींपैकी जास्तकरून आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं या व्यवसायात आलेल्या असतात. तर ३७ टक्के पीडित महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलल्या गेल्याचे ‘अर्ज’ या संस्थेच्या अहवालानुसार दिसून येते. याशिवाय या व्यवसायाकडे बणाऱ्या मुलींपैकी सुमारे 62 टक्के मुलींमध्ये शिक्षणाची कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे.

राज्यात (अन्याय रहित जिंदगी) अर्ज या संस्थेने २०१४ पासून केलेल्या आकलनातून आणि अभ्यासातून अहवाल जारी केलेला आहे. या अहवालानुसार गोव्यात सुटका करण्यात आलेल्या मुलींपैकी 66 टक्के मुली शहरी भागातून, तर 34 टक्के मुली या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. ऑफलाइन पद्धतीने आणण्यात आलेल्या मुलींची टक्केवारी जास्त आहे. 64 टक्के मुली या ऑफलाइन तर 36 टक्के मुली ऑनलाइन पध्दतीने व्यवसायात गुंतलेल्या असल्याचं आढळलं. शरीरविक्रीयाचे धंदे जास्तकरून हॉटेल्स आणि लॉज येथे होत असल्याचे निदर्शनास आलेलं आहे. त्यापाठोपाठ मसाज पार्लर आणि त्यानंतर फ्लॅट आणि बंगलोमध्ये होतात.

हॉटेल-लॉजमध्ये 77.7 टक्के, मसाज पार्लरमध्ये 12.4 , तर फ्लॅट-बंगलोमध्ये 9.8 टक्के व्यवसाय

हॉटेल आणि लॉजमध्ये 77.7 टक्के, मसाज पार्लरमध्ये 12.4 , तर फ्लॅट व बंगलोमध्ये 9.8 टक्के व्यवसाय केला जातो. या व्यवसायात येण्यासाठी उद्युक्त करणाऱ्यांच्या माहितीचा विचार करता जास्तकरून मित्रांकडूनच या व्यवसायात मुलींना लोटले जाते. 34.5 टक्के मित्रांच्या माध्यमातून आलेल्या मुली आढळून येतात. त्यानंतर ओळखीच्या 22.1 टक्के व्यक्ती, अनोळखी व्यक्तींव्दारे 23.3 टक्के मुली, तर नजीकच्या व्यक्तींकडून आलेल्या 10.9 टक्के मुली आढळून आलेल्या आहेत.

या व्यवसायात 25 ते 35 वयोगटांतील मुली सर्वाधिक 43 टक्के

सुटका करण्यात आलेल्या मुलींच्या वयाचा विचार करता या व्यवसायात 25 ते 35 वयोगटांतील मुली सर्वाधिक 43 टक्के आढळतात. त्यापाठोपाठ 21 ते 25 वयोगटांतील 35 टक्के, 18 ते 21 वयोगटांतील 13 टक्के, 35 वयोगटांतील 6 टक्के महिला या व्यवसायात असल्याचे आतापर्यंत समोर आलेलं आहे. राज्यात आतापर्यंत वेश्या व्यवसायावर छापा टाकून मुलींची सुटका करण्यात गुन्हे शाखेचा पहिला क्रमांक लागतो.

35.6 टक्के मुलींची गुन्हे शाखेकडून सुटका

35.6 टक्के मुलींना गुन्हे शाखेकडून सोडवण्यात आलेले आहेत. यानंतर कळंगुट, अंजुना, पणजी, मडगाव आणि पर्वरी या पोलीस स्थानकांचा नंबर लागतो. सुटका करण्यात आलेल्या मुलींपैकी पुन्हा या व्यवसायात आढळलेल्या मुलींची संख्या ही 6.3 टक्के एवढी कमी आहे. वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये शिक्षणाची कमी असल्याचं आढळून आलं आहे. 20 टक्के मुली या शाळेत गेलेल्या नाहीत. 12 टक्के मुलींनी प्राथमिक शिक्षण, तर 30 टक्के मुलींनी नववीपर्यंत शिक्षण घेण्याचं आढळून आलेलं आहे. 22 टक्के मुली या दहावी आणि बारावी केलेल्या असून पदवीप्राप्त 2 टक्के मुली या क्षेत्रात आलेल्याचं दिसून आलं आहे.

अविवाहित मुलींची संख्या अधिक

पीडितांची लग्नाबाबतच्या स्थितीची पडताळणी केल्यावर विवाह न झालेल्या 35.7 टक्के मुली या व्यवसायात आढळल्या. याशिवाय लग्न झालेल्या 24 टक्के, लग्न होऊन वेगळ्या झालेल्या 20.3 टक्के, घटस्फोट घेतलेल्या 10.6 टक्के, विधवा 4 टक्के, तर लिव्हिंग इन रिलेशनशिपमधील 5.4 टक्के महिला वेश्या व्यवसायात दिसून आलेल्या आहेत.

हा व्हिडिओ पहाः NO CASINO IN PEDNE | चांगल्या प्रकल्पांचं स्वागत, मात्र पेडणेत कॅसिनोला विरोधच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!