ओहोळात मृत आढळलेल्या ‘त्या’ युवतीचा खूनच!

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : पाडी येथील अनिशा वेळीप (वय 18) हिचा मृतदेह घरानजीकच्या ओहोळात आढळून आला होता. शवविच्छेदनानंतर तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या असल्याने या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे. तर सर्वेश गावकर (वय 23) याच्या अंगावर खुणा आढळून आलेल्या नसल्याने त्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे. तरीही सर्व बाजूंनी तपास केला जाईल, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग (Pankaj Kumar Singh) यांनी दिली.
पाडी येथील अनिशा ही तिच्या घरानजीक असलेल्या ओहोळात कपडे धुण्यासाठी गेली होती. ती घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांकडून शोध घेण्यास सुरुवात केली असता ती ओहोळात पडलेली आढळून आली. यानंतर तिला बाळ्ळी आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपचाराआधीच ती मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
ओहोळाचा प्रवाह कमी असल्याने व पात्रही खोल नसल्याने अनिशाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. कुंकळ्ळी पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, अनिशाच्या मृत्यूपूर्वी काही वेळ आधी सर्वेश गावकर याला घटनास्थळावरून जाताना पाहिल्याचे सांगण्यात आले. अनिशा ही केपे महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती, तर सर्वेश हा एका कंपनीत कामासाठी जात होता.
अनिशा व सर्वेश एकमेकांना ओळखत असल्याचेही तपासात पुढे आले. यानंतर सर्वेश गावकर याच्या कावरे येथील घराकडे चौकशी केली असता तो घरी नसल्याचे आढळून आले. आजूबाजूला शोधाशोध केली असता घरानजीकच्या एका झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. कुंकळ्ळी व केपे पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.
पोलिस अधीक्षक सिंग म्हणतात…
शवविच्छेदनात मुलीच्या अंगावर जखमा आढळून आल्याने तिला पाण्यात बुडवून मारण्यात आल्याचे स्पष्ट होतेय. त्यामुळे कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात हत्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सर्वेश गावकर याच्या शरीरावर जखमा आढळून न आल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट होतेय. मात्र, त्यानंतरही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जाईल.