ओढणीच्या झोपाळ्याने केला घात!

शेखर नाईक | प्रतिनिधी
फोंडा : ओढणी बांधून तयार केलेल्या झोपाळ्यावर झुलताना ती ओढणी गळ्याभोवती आवळल्याने सात वर्षीय बालिकेचा हकनाक बळी गेला. ही दुर्दैवी घटना नागझर-कुर्टी येथील हाउसिंग बोर्ड परिसरात घडली.
मोठ्या बहिणीकडे झोपाळ्यासाठी हट्ट
सदर कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील असून ते नागझर-कुर्टी येथे राहत होते. बुधवारी सकाळी आईवडील कामावर गेल्यानंतर या बलिकेने आपल्या मोठ्या बहिणीकडे ओढणीचा झोपाळा बांधून देण्याचा आग्रह धरला. तिने झोपाळा बांधून दिला. छोट्या बहिणीने त्यावर झोके घ्यायला सुरुवात केली. नंतर मोठी बहीण घरात काम करण्यासाठी गेली.
…आणि अनर्थ घडला!
झोपाळ्यावर झोके घेणार्या लहान बालिकेच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळला गेला. त्यातून सुटण्यासाठी तिने धडपड केली आणि ती जमिनीवर पडली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तिचा श्वासोच्छवास थांबला होता.
शेजारणीने पाहिलं आणि…
हा प्रकार घडला तेव्हा या मुलीची मोठी बहीण घरात कामात व्यग्र होती. छोटी मुलगी निपचित पडणल्याचे शेजारीच राहणार्या महिलेच्या लक्षात आले. तिने त्वरित त्या बालिकेला दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.