या ’75’ लोकांनी एका रात्रीत केला प्रदेश काँग्रेसचा सौदा, चोडणकरांची पोलिसात तक्रार

अपात्रता याचिकेला इंटरेस्टींग वळण

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी मंगळवारी गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसच्या 10 तर मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी दाखल केलेली मगोच्या 2 आमदारांविरोधातील अपात्रता याचिका फेटाळून लावल्या. या याचिका फेटाळल्यामुळे या सर्व 12 आमदारांचे पक्षांतर कायदेशीर ठरले आहे. आता या सर्व 12 आमदारांनी आपापल्या पक्षांसह भाजपात विलीन होण्याच्या प्रकरणाने इंटरस्टींग वळण घेतलेए. प्रदेश काँग्रेस पक्ष विलिनीकरणाच्या प्रस्तावावर 10 बंडखोर आमदारांसह 65 प्रदेश समिती सदस्यांच्या सह्या आहेत. या सर्वांनी बनावटगिरी करून हे विलिनीकरण घडवून आणल्याचा ठपका ठेवून कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा याचिकादार गिरीश चोडणकर यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केलीए.

हेही वाचा – काँग्रेस कोलमडतंय; आप सावरतंय

गोव्याच्या नावावर आणखी एक बट्टा

राजकीय पक्षांतरामुळे गोवा याआधीच बदनाम झालाय. त्यात मगो आणि काँग्रेसचे नाव आघाडीवर होते. आता भाजपने या दोन्ही पक्षांच्या पक्षांतरांवर मात करून एक नवा इतिहास नोंदवलाय. या प्रकरणामुळे राजकारणात किती खालच्या दर्जापर्यंत जाऊन कुरघोडी केल्या जाऊ शकतात आणि लोकांना टोपी घातली जाऊ शकते याचे उदाहरणच या प्रकरणातून समोर आलंय. पक्षांतर केलेल्या आमदारांना नव्याने निवडणूकांना सामोरे जाण्याचे टाळण्यासाठी विरोधी पक्षच भाजपात विलिन केला जात असल्याचे कुभांड रचण्यात आले आणि त्यात या 10 बंडखोर आमदारांनी आपल्या नजीकच्या कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांच्या सह्या घेऊन हे एकूणच राजकीय नाट्य घडवून आणले.

हेही वाचा – पतीपत्नी जोडीनं निवडणुकीला उभे राहिले, जोडीनं पडले, ‘या’ पालिकेतला इंटरेस्टिंग निकाल

ही कलमे लावा

गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत या सर्व 75 लोकांवर भारतीय दंड संहितेचे कलम 463, 465, 468, 471, 473, 476, 420,192, 193, 199, 200, 209, 120B आदी लावण्याची विनंती तक्रारीत केलीए.

कोण कोण आहेत या कटात…?

गोवा प्रदेश काँग्रेसचे भाजपात विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावावर पहिल्या 10 सह्या बंडखोर आमदारांच्या आहेत. ह्यात चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिगीस, जेनिफर मोन्सेरात, इजिदोर फर्नांडिस, नीळकंठ हळर्णकर, बाबूश मोन्सेरात, आंतोनियो फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, विल्फ्रेड डीसा, क्लाफासियो डायस यांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त 65 लोकांच्या सह्या या प्रस्तावावर आहेत. हा प्रस्ताव 10 जुलै 2019 रोजी मंजूर केल्याचा दावा करण्यात आलाए.

हेही वाचा – सभापती हरले… पाटणेकर जिंकले! याचिकाच अपात्र; बंडखोर मात्र पात्र

बनावट दस्तएवज, शिक्के आणि बरंच काही

या एकूणच कटात बंडखोरांनी बराच मोठा डाव आखल्याचे उघड झालंय. प्रदेश काँग्रेस समितीचा बनावट मिनिट बुक, बनावट शिक्के, बनावट लेटरहेड आदींचा पोलखोल या तक्रारीत करण्यात आलाए. गोवा प्रदेश काँग्रेस समितीची बैठक 10 जुलै 2019 रोजी झालीच नाही,असेही चोडणकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा – मिलिंद सोमण 55 वर्षाचे झाले! त्यांचा बीचवरचा नग्न फोटो पाहून गिरीश चोडणकर म्हणाले…

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!