हाऊसिंग बोर्ड | 200 घरं आणि 150 प्लॉटचे दर खरंच स्वस्त आहेत का?

मार्चपर्यंत विक्री! ३० वर्षांचा रहिवासी दाखला अनिवार्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गृहनिर्माण मंडळामार्फत मार्चपर्यंत गोमंतकीयांसाठी २०० सदनिका आणि १५० भूखंड कमी दरांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदनिका आणि भूखंड मिळवण्यासाठी ३० वर्षांचा रहिवासी दाखला अनिवार्य असेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष शिरोडकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

पाहा सविस्तर रिपोर्ट –

फर्मागुडी, कुर्टी-फोंडा, सांकवाळ तसेच इतर आणखी दोन ठिकाणी गृहनिर्माण मंडळाच्या २०० सदनिका आहेत. त्यासाठी मार्चमध्ये ई-लिलाव करण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंडळाच्या सदनिकांचे दर मार्केटमध्ये सध्या असलेल्या दरांपेक्षा चार ते पाच लाखांनी कमी असतील. त्यामुळे परिसरानुसार २० ते ३० लाखांपर्यंत त्या गोमंतकीयांना देण्यात येतील, असे शिरोडकर म्हणाले.

मंडळाने शेल्डे, काणकोण, थिवी, धारगळ आणि कोलवाळ येथील १५० भूखंडही विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति चौरस मीटर पाच ते सात हजार रुपये दराने ३०० चौरस मीटर भूखंडांची विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, खुला, स्वातंत्र्य सैनिक असे आरक्षणही असणार आहे. दीडशे भूखंड देता येईल इतकी जागा गृहनिर्माण मंडळाकडे आहे, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यातील जमिनी तसेच सदनिका परप्रांतीय मोठ्या प्रमाणात बळकावत आहेत. त्यांना सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांचा ‘आशीर्वाद’ मिळत आहे, अशी टीका गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्ष तसेच काही स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे. राज्यातील पडिक असलेल्या सरकारी जमिनीतील भूखंड तसेच गृहनिर्माण मंडळाच्या सदनिका सर्वसामान्य गोमंतकीयांनाच मिळाव्या, अशी मागणीही त्यांच्याकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता २०० सदनिका आणि १५० भूखंड पुढील महिन्यात विक्रीसाठी काढून त्याचा नीज गोंयकारांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

गोमंतकीयांच्या फायद्यासाठीच अटीत बदल

गृहनिर्माण मंडळाच्या सदनिका आणि भूखंडांचा नीज गोंयकारांना फायदा व्हावा यासाठी सरकारने अटीत बदल करून ३० वर्षांचा रहिवासी दाखला अनिवार्य केला आहे. हा दाखला देण्याचे अधिकार दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहेत, असेही सुभाष शिरोडकर यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!