गव्यांचा कळप अडकला विर्नोडा-म्हस्कोण भागात

मार्च-एप्रिल महिन्यात गवे आल्याचा अंदाज; गव्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः विर्नोडा म्हस्कोण येथील नियोजित क्रीडा नगरीच्या जागेत पाच गव्यांचा एक कळप अडकला असून हा कळप विर्नोडा भागातील तिथल्या शेताची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहे. हा कळप मार्च-एप्रिल महिन्यात आला असावा असा अंदाज आहे. एका रानातून दुसऱ्या रानात जिथे चारा मिळेल तिथून हा कळप अन्नाच्या शोधात आलेला आहे, जाण्यासाठी वाट नसल्यानं तो अडकला आहे. वनखात्याने त्यांची सुटका करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

गव्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी

विर्नोडा म्हस्कोण या ठिकाणी एका बाजूने रेल्वे मार्ग जातो, तर दुसऱ्या बाजूने तिळारी प्रकल्पाचा कालवा जात आहेत. या कालव्यातून उतरून जायला गवे घाबरतात. त्यामुळे ते याच ठिकाणी अडकून आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनाही या गव्यांच्या कळपामुळे शेतात, बागायतीत जाणं धोक्याचं वाटतंय. मोपा विमानतळाच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याने आणि मोठमोठी यंत्रणा ठिकठिकाणी असल्याने पूर्वीचे जनावरांचे मार्ग बंद झाले आहेत. वनखात्याने या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करायला हवा, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या कळपासोबत एक छोटे वासरू असल्याने हा कळप चवताळलेला आहे. या गव्यांना सुरक्षित मार्ग काढून वनखात्याने उपाय योजना करावी अशी मागणी शेतकरी करताहेत.

इतर ठिकाणी शेतीची नासाडी

मोठ्या कष्ठाने, प्रयासाने लॉकडाऊन काळात पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेताची मशागत केली. आता जंगली जनावरांनी शेताचं नुकसान करायला सुरुवात केलीये. हसापुर भागात सलग चार दिवस गवे रेडे धुमाकूळ घालतायत. त्याशिवाय पाण्याच्या कॅनलमध्ये मनोसक्त मस्ती करतानाही दिसतायत. हसापुर, चांदेल, इब्रामपूर या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती-बागायती, केळी बागायती तसंच इतर पाले भाज्या पिकवतात. परंतु उत्पन घेण्याच्यावेळी रानटी जनावरे या बागायतीत घुसून लाखो रुपयांचं नुकसान करतात. मात्र सरकारकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी विशाल नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनखात्याने या रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जातेय.

लोकवस्ती वनात, वन्य प्राणी लोकवस्तीत

पूर्वी जाणकार अगोदर पाण्याची सोय पाहून लोकवस्तीसाठी घरं बांधत होते. आता काळ बदलला असून आताची माणसं अगोदर घर बांधतात आणि नंतर पाण्याची सोय करतात. जंगल हे वन्य प्राण्यांसाठी राहीव ठेवलं जायचं. त्यामुळे कधी चुकूनही वन्यप्राणी लोकवस्तीत येत नसत. परंतु आता लोकवस्तीत वन्यप्राणी शिरू लागले आणि लोकवस्ती वनात वाढू लागलीये. माणूस जंगलात जाऊन मोठ्या प्रमाणात जंगल तोड करू लागलाय. मग जंगलातील प्राणी जाणार कुठे? याचा माणसाने विचार केला नाही. जंगलातील वन्य प्राण्यांना आज इतर वन्य प्राण्यांकडून नव्हे, तर मनुष्याकडून धोका निर्माण झालाय.

हेही वाचाः एनसीबी मुंबईकडून 12 किलो गांजा जप्त

माकडांच्या पाठोपाठ गव्यांचा धुमाकूळ

पेडणे तालुक्याचा विचार केला तर मागच्या 7 ते 8 वर्षांपूर्वी चांदेल, हसापुर, इब्रामपूर,  हळर्ण, तळर्ण, पत्रादेवी, कासारवर्णे, हाळी या भागात जंगलातील हत्ती लोकवस्ती घुसून शेताची, बागायातीची, फळा-फुलांची नासाडी करत असत. मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांचं नुकसान होत असे. त्यांच्या नंतर आता गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवला आहे. त्याशिवाय माकड आणि खेती पूर्णपणे लोकवस्तीत घुसून थैमान घालतायत. घराची कौले, बागायतींचं नुकसान करतायत. त्यामुळे यांचा वन्य खात्याने बंदोबस्त करायला हवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!