कुडकर कुटुंबाच्या गणेशोत्सवाला 480 वर्षांची परंपरा

गोव्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूरचे कुटुंबीय येतात सिंधुदुर्गातल्या हुमरस - कुवरवाडीत !

रुपेश पाटील | प्रतिनिधी

सावंतवाडी : हुमरस येथील कुवरवाडी या वाडीत वास्तव्यास असणारे कुडकर कुटुंबियांचा सुमारे ४८० वर्षांची परंपरा असलेला महागणपती आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कुडकर परिवारातील बालकं, प्रौढ आणि ज्येष्ठ अशा त्रिवेणी संगमातून संपूर्ण अकरा दिवस गणपतीचा जयघोष कुवरवाडीत दुमदुमून जातो. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोव्यात राहणारी कुडकर कुटुंबीयांची सर्व आप्तेष्ट मंडळी दरवर्षी महागणपतीच्या उत्सवासाठी आपल्या कुटुंबियांसह जातीने हजर असतात.

कुडकर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य गंगाराम कुडकर गणेशोत्सवाबद्दल सांगतात की, आमच्या कुडकर कुटुंबियांसाठी हा गणेशोत्सव म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचा संस्कार आहे. गणपती पर्वाचा हा आमचा एक स्नेहाचा सोहळाच आहे. आम्ही सर्व एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन गणेशोत्सव साजरा करतो. आमच्या पुढच्या पिढीतही हा गणेशोत्सवाचा संस्कार जाईल, अशी आशा संपूर्ण कुडकर कुटुंबीयांना आहे.

कुडकर कुटुंबीयांत आहे सैनिकांची महान परंपरा…
कुवरवाडीतील कुडकर कुटुंबीय म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक प्रकारे आदर्श निर्माण करणारे कुटुंबीय आहे. कारण तब्बल चार भावंडे भारतीय सैनिक दलात सेवेत होते. आज घडीला ते चारही सैनिक सेवानिवृत्त होऊन वेगवेगळ्या विभागात सेवेत आहेत. यामध्ये संजय कुडकर, महेंद्र कुडकर, अनिल कुडकर, जानू कुडकर हे चारही कुडकर बंधू देशासाठी प्रामाणिक सेवा बजावून सन्मानाने आज सेवानिवृत्त झालेले आहेत.

गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल..
संपूर्ण अकरा दिवस चालणाऱ्या कुडकर कुटुंबियांच्या गणेशोत्सव पर्वात विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. यात भक्तिभावाने केली जाणारी भजने तसेच बालकांसाठी त्यांच्या सुप्तगुणांना वाव देणाऱ्या चित्रकला, अभिनय, पाठांतर अशा महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. भगिनीसुद्धा हिरीरीने गणेशोत्सवाच्या सेवेत स्वतःहून आपला सहभाग नोंदवितात. गणेश मंडपात फुगडी घालणे, गाणी म्हणणे आदी गोष्टी केल्या जातात. तसेच गणेशोत्सव काळात कुडकर कुटुंबातील भगिनी स्वतः विविध पदार्थ बनवितात.

आपल्या सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त होऊन कोल्हापूर येथील वस्तू व सेवाकर विभागात कार्यरत असणारे माजी सैनिक संजय कुडकर यांनी सांगितले की, आम्हा कुडकर कुटुंबीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे एक महोत्सवच आहे. दूर राहणारे आमचे सर्व सदस्य गणेशोत्सव पर्वात एकत्र येऊन आपला आनंद वाटून घेतात. मी सुद्धा सुमारे २२ वर्षे घरापासून सीमेवर देशसेवा केलेली आहे. मात्र आता आम्ही गणेशोत्सव काळात आमचा हरवलेला गणेशोत्सव आनंद आणि गणपती बाप्पाच्या सेवेचा राहिलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी सर्व माजी सैनिक गणेशोत्सवाला एकत्रित येऊन एकमेकांची सुखदुःखे वाटून घेतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!