‘हा’ किनारा पर्यटकांचे नव्हे, कासवांचे ‘फेवरीट डेस्टिनेशन’!

शेखर नाईक | प्रतिनिधी
काणकोण : गोव्याचा समुद्र किनारा प्राधान्याने पर्यटनासाठी ओळखला जातो. देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत असतात. मात्र गोव्यातील किनाऱ्याचा असा एक भाग आहे, जेथे पर्यटक नव्हे, तर कासव न चुकता येतात. दर वर्षी न चुकता अंडी घालण्यासाठी हे कासव येत असतात. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्याच्या गाळजीबाग येथे हे अप्रूप पाहायला मिळतं.
गाळजीबाग नदीच्या समुद्र संगमावर कासव अंडी घालण्यासाठी येत असतात. इतर किनार्याच्या तुलनेत येथील किनारे रुंद आहेत. त्यामुळे कासवांनाही अडी घालण्यासाठी भरपूर जागा मिळते. शिवाय वाळूच्या टेकड्या आणि सागरी वनस्पती यांनी समृद्ध असलेले हे किनारे आता कासवांचे ‘फेवरीट डेस्टिनेशन’ झाले आहेत.
वन खते दक्ष…
वन खात्यानेही स्थानिकांना स्वयंसेवक म्हणून नेमले असून किनाऱ्यावर गस्त घालण्याची, कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्याची, कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात जातील याची काळजी घेण्याची व्यवस्था केली आहे. उत्तर गोव्यातील मोरजी किनाऱ्याच्या धर्तीवर या किनाऱ्यावरही रात्रीच्या वेळी प्रखऱ प्रकाशझोत असलेले दिवे पेटवण्यास, मोठ्याने संगीताचा आवाज करण्यास, किनाऱ्यावर वाहन चालवण्यास बंदी घालतली आहे.
कासव जखमी होण्याचे प्रकार वाढले.
किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणारे कासव मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडून जखमी होतात. दरवर्षी किमान 20 ते 30 कासवांची सुटका केली जाते. स्वयंसेवकांना पुरेसे प्रशिक्षण देणे आणि कासवांवर उपचारासाठी दवाखाना सुरु करणे आदी गोष्टींची गरज आहे.