G20 SUMMIT| गोव्यात जी२० प्रतिनिधींच्या दिमतीला १० नव्या इलेक्ट्रिक बस

ऋषभ | प्रतिनिधी

पणजी, एप्रिल २०२३: गोवा कदंब परिवहन महामंडळ (केटीसी)ने आगामी जी२० बैठकांच्या तयारीसाठी दहा नव्या इलेक्ट्रिक बस सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये शाश्वत प्रवास पर्यायाला प्रोत्साहन देण्याच्या गोवा सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ४८ नवी इलेक्ट्रिक वाहने (इव्ही) खरेदी करण्याची प्रक्रिया सरकारने राबवली आहे. यातून उपलब्ध झालेल्या १० इलेक्ट्रिक बस १७ एप्रिलपासून गोव्यामध्ये नियोजित असलेल्या जी२० बैठकांसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्याचे नियोजन कंदब महामंडळाने केले आहे.
नवीन प्रणाली ठरणार फायदेशीर
फेम-२ (फास्टर एडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेअंतर्गत गोवा सरकारने खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक मिनी-बसच्या ताफ्यातील दहा बस कदंब महामंडळाद्वारे जी२० बैठकांसाठी सज्ज ठेवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, स्वयंचलित भाडे संकलन प्रणालीमुळे या बसमध्ये वाहकाची (कंडक्टरची) गरज न पडता प्रवासी क्युआर कोडच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांच्या तिकिटांचे पैसे देऊ शकणार आहेत. इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस), जीपीएस ट्रॅकिंग आणि इतर वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांना बसचे प्रत्यक्ष स्थळ कोठे आहे हे शोधण्यास तसेच पर्यायी मार्गाचा अवलंब करणे आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यास सुलभ होणार आहे. याशिवाय, प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवर बसचे तपशील, वाहनाचे स्थान, आगमनाची अपेक्षित वेळ आणि प्रवासाचा कालावधी यासारखी वास्तवकालीन माहिती मिळू शकेल. बसमधील एलईडी फलकद्वारे पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट ठळकपणे दर्शवतात तसेच स्मार्ट बसस्थानकावरील एलईडी फलक बसच्या आगमनाची आणि निर्गमनाची अचूक वेळ दर्शवत असल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कामांचे अधिक कार्यक्षमपणे नियोजन करण्यास मदत करतात.

वाहतूक सुरळीतपणे राखण्याबाबत सरकारची तयारी
जी२० बैठकांच्या प्रवास व्यवस्थेबाबत झालेल्या बैठकीमध्ये परिवहन संचालक राजन सातार्डेकर यांनी बैठकीदरम्यान वाहतूक सुरळीतपणे राखण्याबाबत सरकारची तयारी स्पष्ट केली. “जी२० शिखर परिषद हा एक देशासाठी प्रतिष्ठित कार्यक्रम आहे. इलेक्ट्रिक बसद्वारे गोव्यातील बैठकांच्या आयोजनाच्या यशामध्ये आणखी एक मापदंड स्थापित होईल. बैठकीस येणाऱ्या प्रतिनिधींचे दिमाखदार आदरातिथ्य करणे आणि या बैठकांचे आयोजन यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सरकार उत्सुक आहे. आणि म्हणूनच अधिक संख्येतील छोट्या छोट्या वाहनांच्या वापरापेक्षा इलेक्ट्रिक बस वापरण्याचा पर्याच उत्तम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. श्री. सातार्डेकर यांनी आंतरशहर मार्गावर काही इलेक्ट्रिक बस तैनात करण्याची सरकारची योजना असल्याचेही सांगितले.

जी२० शिखर परिषदेच्या बैठकांसाठी राज्यात इलेक्ट्रिक बस चालवण्यास विशेष परवनागी देण्यात आल्याचे कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक डेरेक परेरा नेतो यांनी स्पष्ट केले. “स्मार्ट सिटी प्रकल्पांतील कामाच्या पूर्णत्वासाठी ३० जूनची मुदत असल्याने ही वाहने जुलै महिन्यापर्यंत स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी वापरण्यात येतील.” असेही त्यांनी सांगितले. आगामी जून महिन्यापर्यंत आणखी ३८ इलेक्ट्रिक बस राज्यात उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
जी२० परिषदेच्या आठ बैठकांचे आयोजन गोव्यातील ग्रँड हयात गोवा आणि ताज रिसॉर्ट अँड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये होणार आहे. ग्रुप ऑफ ट्वेंटी किंवा जी२० हा जगातील सर्वात शक्तिशाली १९ अर्थव्यवस्था आणि युरोपी महासंघ यांचा समावेश असलेला आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचा प्रमुख मंच आहे. जी२० गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय वित्त, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, हवामानातील बदलांमुळे होणारे स्थलांतर आणि शाश्वत विकासाशी संबंधित असलेल्या प्रमुख जागतिक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपीय महासंघ (ईयु) या देशांचा समावेश जी२०मध्ये आहे. अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनाही या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
