अंधभक्तांनी दरवाढीबाबत आवाज उठवावा : बर्डे

म्हापशात इंधन दरवाढीबाबत निदर्शने

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलमध्ये भरमसाट दरवाढ करून लोकांचे कंबरडे मोडले आहे. डोळे मिटून बसलेल्या भाजपच्या अंधभक्तांनी डोळे उघडून या दरवाढीबाबत जाब विचारावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

गुरुवारी दुपारी येथील उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांना दरवाढीबाबत राष्ट्रवादी पक्षाने निवेदन सादर केले. तसेच सरकारी संकुल इमारतीसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोलच्या बाटल्या व फलक घेत निदर्शने करून सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी संजू तिवरेकर, रियाझ शेख, सितेश मोरे, अनिल केरकर, दिपेश नाईक, केशव बर्डे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकांनी आवाज उठविण्याची गरज!

इंधन दरवाढीच्या किमती वाढत चालल्या आहेत. अशा वेळी भाजपचे अंधभक्त डोळे मिटून गप्प आहेत. या भक्तांनी सरकारविरोधात डोळे उघडू नयेत म्हणून शिबिरांच्या माध्यमातून त्यांच्या नेत्रचिकित्सांचे सत्र सरकारने राबविले आहे. पूर्वीच करोनामुळे लोकांचे आर्थिक गणित कोलमडले असून अशा वेळी ही दरवाढ जनतेला परवडणारी नाही. त्यामुळे लोकांनी जागे होऊन सरकारच्या धोरणावर आवाज उठविण्याची गरज आहे, असे बर्डे म्हणाले.

पर्रीकरांच्या आश्वासनाचे काय?

तत्कालीन मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांनी पेट्रोलचे दर 60 रुपयांपेक्षा जास्त होणार नाहीत, असे सांगितले होते. पण विद्यमान भाजप सरकारच्या काळात राज्यात 85 रुपये प्रति लिटर असा पेट्रोलने उच्चांक गाठला आहे, तर दुसर्‍या बाजूने मंत्री करदात्यांच्या पैशांतून सरकारी गाड्यांमधून फिरत आहेत. गाडीच्या इंधनावर पदरमोड केल्यास त्यांना सर्वसामान्यांवरील भुर्दंडाची कल्पना येईल. सुलभ रस्ते, मुबलक पाणी या गरजा पुरविण्यास भाजप सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत लोकांनी सतर्क राहून भाजप विरोधी मतदान करावे, असे आवाहनही बर्डे यांनी केले. पालिका निवडणुकीवर डोळा ठेवून म्हापसेकरांची फसवणूक करण्यासाठीच बस स्थानकाची पायाभरणी करण्यात आली आहे, असा आरोप संजय बर्डे यांनी केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!