प्रजासत्ताकदिनी स्वातंत्र्यसैनिकांचं उपोषण सुरूच

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या मागण्यांसाठी ही संघटना बरेच दिवस झाले आंदोलन करतेय.

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजीः स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सरकार दरबारी न्याय मिळवण्यासाठी येथील आझाद मैदानावर सुरू केलेलं आमरण उपोषण एका वेगळ्याच वळणावर पोहचलं आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं, असा दावा केला होता. परंतु उपोषणकर्त्यांनी मात्र आपलं उपोषण सुरूच ठेवल्यानं सरकारची अडचण बनलीय. गणतंत्रदिनी आझाद मैदानावर स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांची मुलं उपोषण करीत असल्याच्या दृश्यानं सरकारची बरीच बदनामी झालीय.

सरकारचं आश्वासन

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या मागण्यांसाठी ही संघटना बरेच दिवस झाले आंदोलन करतेय. त्यांनी सर्वांची भेट घेऊन निवेदनंही सादर केलीत. परंतु त्यांना ठोस आश्वासन मिळत नसल्याने त्यांनी अखेर मागील आठवड्यापासून आमरण उपोषणाचा पावित्रा घेतलाय. 26 रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. संघटनेने आपल्या 18 मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं होतं. सरकारने पुढील दीड महिन्याच्या कार्यकाळात राहीलेल्या 23 स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या देण्याचं मान्य केलंय. उर्वरीत 26 उमेदवारांच्या नावांची यादी द्या, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला कळवलं आहे. काही उमेदवारांना गोवा मानवसंसाधन विकास महामंडळामार्फत रोजगार देऊ तसंच उर्वरीतांना सरकारी पदं रिक्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सामावून घेऊ,असंही आश्वासन उपोषणकर्त्यांना दिलंय. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांबाबत काहीतरी तोडगा काढू,असा शब्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलाय.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇

उपोषण सुरूच

एकीकडे सरकारी पत्रकं म्हणतंय की स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना उपोषण मागे घेण्याचे आश्वासन दिलंय पण प्रत्यक्षात मात्र हे आंदोलन सुरूच आहे. अशी आश्वासने यापूर्वी अनेकदा दिली. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही किंवा कागदोपत्री लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही,असा अट्टाहास उपोषणकर्त्यांनी केल्याने आता हा विषय आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसोबतच काही वयोवृद्ध स्वातंत्रसैनिकही उपोषणाला बसल्याने हा विषय संवेदनशील बनण्याचा धोका निर्माण झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!