स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचं निधन

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
मडगाव : भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतलेले आणि गोव्यातील सहकार चळवळीला मोठे योगदान दिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर (89) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. गुरुवारीच मडगाव स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पुत्र सुदेश, पत्नी, विवाहित कन्या व अन्य परिवार आहे.
सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सहकार श्री हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. ते काँग्रेस समितीचे सदस्य तसेच सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते. 1942 साली त्यांनी ब्रिटिशांविरुद्धात क्वीट इंडिया मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना नउ दिवसांचा कारावास ठोठावण्यात आला होता. या मोहिमेत अरुणा असफ अली यांचाही समावेश होता. मडगाव अर्बन सहकारी पतसंस्था, गोवा अर्बन सहकारी पतसंस्थेसह आणखी काही संस्थांच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. गोवा पत्रकार संघाच्या स्थापनेतही त्यांचे योगदान होते.