गोव्यातील पत्रकारितेचा ‘बाप माणूस’ गेला

स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक लॅम्बर्ट मास्कारेन्हास निवर्तले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, पत्रकारितेतील ‘बाप माणूस’ तथा लेखक लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 106 वर्षांचे होते. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना गोवा सरकारचा सर्वोच्च गोमंतविभूषण तर भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. एक जाज्वल्य गोमंतकीय कॅथोलिक राष्ट्रप्रेमी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राष्ट्रहीतासाठीच्या पत्रकारितेचा एक अध्याय पूर्ण झाला, असंच म्हणावे लागेल.

गोव्यात जन्म पण कर्मभूमी मुंबई

गोव्यात 17 सप्टेंबर 1914 साली जन्मलेल्या लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचे प्रारंभीचे शिक्षण पुण्यात तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई इथे झाले. पोर्तुगिजांच्या जोखडातून गोव्याला मुक्ती दिल्यानंतरच आपण विवाह करू, असा संकल्प त्यांनी सोडला होता. यानुसार गोवा मुक्तीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच 29 डिसेंबर 1961 रोजी ते डॉ. ज्यॉली मास्कारेन्हास यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांना चार मुलं आहेत. दोनापावला येथे ते आपल्या घरी राहत होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पत्रकारितेतला बाप माणूस

लॅम्बर्ट मास्कारेन्हास हे पत्रकारितेतील बाप माणूस होते. प्रारंभी मुंबईत मॉर्निंग स्टँडर्ड या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. यानंतर बॉम्बे सेंटिनलमध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले. यानंतर ऑनलुकरमध्ये ते सहाय्यक संपादकपदी रूजू झाले. तिथून गोवन ट्रीब्यूनचे ते संपादन बनले. इथूनच त्यांनी गोवा मुक्तीलढ्याला प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्यासाठी मोठे योगदान दिले. गोव्यात पोर्तुगिजांच्या राजवटीत गोंयकारांची कशी मुस्कटदाबी सुरू होती आणि गोव्यात नागरी हक्कांची कशी गळचेपी होत होती, याचे दर्शन त्यांनी भारताला घडवले. आपल्या लेखणीतून त्यांनी पोर्तुगिज राज्यकर्त्यांवर चांगलाच सूड उगवला होता. त्यांच्या लेखणीने घायाळ झालेले पोर्तुगिज राज्यकर्ते त्यांचा डुख धरून होते. एकदा ते गोवा दौऱ्यावर असताना त्यांना अटक करून कैद करण्यात आले. यानंतर जामीनावर त्यांची सुटका झाली खरी परंतु त्यांना गोव्यातून हद्दपार करण्यात आले. परंतु गोव्याबाहेर मुंबईत राहून त्यांनी आपल्या लेखणीच्या आधारे गोवा मुक्ती चळवळीला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी बरेच योगदान दिले.

गोवामुक्तीनंतर गोव्यात सक्रिय

गोवा मुक्तीनंतर लॅम्बर्ट मास्कारेन्हास गोव्यात आले. गोव्यातील पत्रकारितेत ते सक्रिय बनले. द नवहिंद टाईम्स या इंग्रजी दैनिकाचे ते संपादकपद बनले. यानंतर त्यांनी गोवा टूडे हे नियतकालिक सुरू केले. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशीत झालीएत. त्यात सॉरो लाइस माय लॅण्ड हे पुस्तक 1955 साली प्रकाशीत झाले. डॉ. राम मनोहर लोहीया यांनी 1946 साली गोव्यात क्रांतीची ठिणगी उडवल्यानंतर पोर्तुगिजांविरोधात सुरू झालेल्या असंतोषावर आधारीत घटनांची माहिती दिली आहे. द फर्स्ट सिटी, इन द वूंभ ऑफ सौदादे, ग ग्रेटर ट्रेजडी आणि हार्टब्रेक पेसेज अशी त्यांची साहित्यनिर्मिती आहे.

पद्मश्री आणि गोमंतविभूषणाने सन्मानीत

लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांना 2004 साली लक्ष्मीदास बोरकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. यानंतर 2014 मध्ये त्यांना गोव्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोमंत विभूषण प्रदान करण्यात आला तर 2015 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

शोध पत्रकारिता पुरस्कार

गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांच्या नावाने शोध पत्रकारितेसाठीचा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. गोव्यातील पत्रकारितेत या पुरस्काराला मोठा मान प्राप्त आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!