मुंबईत चार मजली बिल्डिंग कोसळली ; 11 जणांचा मृत्यू

मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड इथं घडली दुर्घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे.

मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “१७ जखमींना आणण्यात आलं होतं. यामधील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. इतर आठ जणांवर उपचार सुरु होते”. पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानुसार, रात्री ११ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी असून बचावकार्य सुरु आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!