आजपासून चार दिवस मुसळधार!

राज्यात ऑरेंज अलर्ट जारी; काही भागांत पूरस्थितीचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: शनिवार ते मंगळवार असे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य हवामान विभागाने या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही विभागाने जारी केलेल्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचाः तान्हुल्याच्या अपहरणाने खळबळ; गोमेकॉच्या आवारातील घटना

यंदा मान्सून 5 जूनला झाला दाखल

यंदा राज्यात मान्सून ५ जूनला चोरपावलांनी दाखल झाला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट झाला नाही. गेल्या सहा दिवसांत मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरीही लावलेली नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे शनिवारपासून पुढील चार दिवस मान्सूनचा पाऊस अहोरात्र कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या चार दिवसांत काही भागांत २४ तासांत सुमारे २० मिमी पावसाची नोंदही होऊ शकते. त्यामुळे त्या भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दरडीही कोसळू शकतात, असं विभागाने म्हटलं आहे.

१ जूननंतर आतापर्यंत ७.२२ इंच पावसाची नोंद

मान्सून काळात म्हणजेच १ जून ते ११ जून या कालावधीत राज्यात ७.२२ इंच पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ८.१६ इंच पाऊस पडला होता. तौक्ते चक्रीवादळानंतर गोव्यात पावसाचं प्रमाण कायम आहे. पण मुसळधार पावसाची नोंद झालेली नाही. काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.

हेही वाचाः आंतरमंत्रालयीन पथकाची बैठक; तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचा घेतला आढावा

दरम्यान, पुढील चार दिवस अरबी समुद्रात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!