माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची युनिकेम फार्मास्यूटिकल्सला भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः कोविड महामारीमुळे सध्या पर्यटन व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्व कामगारांच्या नोकरीवर संक्रांत आली आहे. समुद्रकिनारी भागात तर बेकारी शिगेला पोचली आहे. साळगाव मतदार संघातील कित्येक युवक नोकरी नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. साळगाव-पिळर्ण पठारावर असलेल्या औद्योगिक वसाहतीत जास्त गोव्याबाहेरच्या कामगारांचा भरणा आहे.
या औद्योगिक वसाहतीत साळगाव मतदारसंघातील स्थानिक युवकांना प्राधान्य दिलं जावं, या अनुषंगाने बुधवारी सकाळी माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी साळगाव मंडळ कार्यकरणीच्या काही सदस्यांसमवेत युनिकेम फार्मास्यूटिकल्सच्या कंपनीचे व्यवस्थापक दुर्गेश पै आंगले यांची भेट घेतली.
हेही वाचाः यंदाच्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर
स्थानिकांना देणार प्राधान्य
वय वर्षं 18 ते 23 या वयोगटातील बीएस्सी, एमएस्सी अथवा बारावी विज्ञान केलेल्या तिनशे युवक युवतींसाठी चार महिन्यानंतर होणार्या नव्या विभागात नोकऱ्यांची तरतूद केली जाईल आणि इथे स्थानिक कामगारांना प्राधान्य दिलं जाईल, असं आश्वासन कंपनीचे व्यवस्थापक दुर्गेश पै आंगले यांनी दिलं.
हेही वाचाः ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना 31 जुलैपर्यंत लागू करा
स्थानिक औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे दार ठोठावण्याची मोहीम
विद्यमान आमदार साळगाव मतदारसंघातील वायदा केलेल्या स्थानिक युवकांना चार वर्षांत कुठेही नोकऱ्या देण्यात अपयशी ठरल्याने स्थानिक औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे दार ठोठावण्याची ही मोहीम सुरू केली असल्याचं माजी मंत्री दिलीप परुळेकरांनी यावेळी सांगितलं.