तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा: तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल विरूध्दच्या खटल्याचा अंतिम निवाडा शुक्रवारी पार पडला. तेजपाल यांच्यावरच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हेही वाचाः तरुण तेजपाल खटल्याचा अंतिम निवाडा आज, काय लागणार निकाल?
काय आहे प्रकरण?
तरुण तेजपाल हे तेहेलका मॅगझिनचे मुख्यसंपादक होते. २०१३मध्ये ते एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टमधून जात असताना त्यांनी आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केला असा आरोप त्यांच्यावर आहे. गोव्यात एका कार्यक्रमाच्या वेळी ही घटना घडली होती. गोवा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली. मे २०१४ पासून त्यांना जामिनावर सोडण्यात आलं होतं. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चित करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती.यापूर्वी या प्रकरणाचा निकाल २७ एप्रिलला लागणार असं जाहीर कऱण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर या निकालाला १९ मे पर्यंत स्थगिती देण्यात आली. आता अखेर शुक्रवारी २१ मेला या प्रकरणाचा निकाल जाहीर करत असताना तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हेही वाचाः तरुण तेजपाल खटल्याचा आजचा अंतिम निवाडा पुढे ढकलला, 21 मे रोजी निकाल
तेजपाल यांचं वैयक्तिक आयुष्य
तेजपाल यांचा जन्म पंजाबच्या जालंधर शहरात 15 मार्च 1963 रोजी झाला. त्यांचे वडील भारतीय सैन्यात होते, त्यामुळे त्यांना देशाच्या विविध भागात राहण्याची संधी मिळाली. तेजपाल यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. तेजपाल यांचं 1985 साली लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव गीता बत्रा आहे. दोघेही कॉलेजमध्ये एकत्र होते. त्यांना दोन मुली आहेत, एकाचे नाव टिया आणि दुसरे कारा.

पत्रकारिता करताना प्रकाशक झाले
56 वर्षीय तरुण तेजपाल हे देशातील नावाजलेले पत्रकार, लेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांच्याकडे पत्रकारितेचा 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. 1980 मध्ये ‘द इंडियन एक्सप्रेस’ या ग्रुपमध्ये काम करून त्यांनी पत्रकारितेच्या कारकीर्दीची सुरूवात केली. यानंतर ते ‘इंडिया -2000\’ नावाच्या मासिकात काम करण्यासाठी नवी दिल्ली येथे आले.
• 1984 मध्ये त्यांनी ‘इंडिया टुडे’ मासिकात वरिष्ठ उप-संपादक म्हणून काम करण्यास सुरवात केली. 1994 मध्ये ते ‘फायनान्शियल एक्सप्रेस’मध्ये दाखल झाले. यानंतर त्यांचा ‘आउटलुक मासिका’शी संबंध आला आणि पुढची कित्येक वर्षे ते या मासिकात कार्यरत राहिले. या काळात त्यांनी ‘इंडिया इंक’ ही स्वतःची प्रकाशन कंपनी सुरू केली. याच कंपनीने अरुंधती रॉय यांची 1998 मध्ये “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” कादंबरी प्रकाशित केली होती. ज्याला बुकर पुरस्कार मिळाला.
• ‘आउटलुक’ सोडल्यानंतर मार्च २००० मध्ये त्यांनी आणखी एक पत्रकार अनिरुद्ध बहल यांच्या सहकार्याने ‘तहलका डॉट कॉम’ या नावाने एक ऑनलाइन इंवेस्टिगेटिव वेबसाइट सुरू केली. 2004 मध्ये, त्याचं एका टॅब्लॉइड वर्तमानपत्रात रूपांतर झालं, तर 2007 मध्ये त्याला मासिकाचं स्वरूप देण्यात आलं.
तहलकाचे स्टिंग
• सन 2000 मध्ये, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगबाबत तहलकाने पहिलं स्टिंग ऑपरेशन केलं. एक वर्षानंतर, 2001 मधील त्याचें दुसरे स्टिंग ऑपरेशन संरक्षण सौद्यांमध्ये दलालीबद्दल होतं. ज्याचं नाव ‘ऑपरेशन वेस्ट एंड’ होतं.
• ‘ऑपरेशन वेस्ट एंड’ अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या फुटेजमध्ये सरकारी अधिकारी आणि नेते बनावट शस्त्रास्त्र कराराच्या बदल्यात कॅमेर्यावर लाच घेताना दिसले. हे स्टिंग समोर आल्यानंतर तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आणि संरक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या स्टिंगमुळे जगभरात खळबळ उडाली आणि तरुण तेजपालनेही यातून बरीच प्रसिद्धी मिळविली.
तेजपाल हे कादंबरीकारही आहेत
2005 मध्ये त्यांनी ‘अॅकेमी ऑफ डिजायर’ ही त्यांची पहिली कादंबरी लिहिली. यानंतर 2009 मध्ये त्यांची ‘द स्टोरी ऑफ माय अॅसेसमेंट्स’ ही दुसरी कादंबरी. 2011 मध्ये त्यांची ‘द व्हॅली ऑफ मेस्कस’ ही कादंबरी प्रकाशित आली.

पुरस्कार आणि सन्मान
• 2001 मध्ये ‘आशियावीक’ या मासिकाने तेजपालचा समावेश आशियाच्या सर्वात सामर्थ्यवान संवादक (कम्युनिकेटर्स) च्या यादीत केला.
• 2001 मध्येच ‘बिझिनेस वीक’ने त्यांना आशियामधील अग्रगण्य नेत्यांच्या यादीत स्थान दिलं.
• 2007 मध्ये, द गार्डियनने त्यांना 20 लोकांमध्ये समाविष्ट केलं, जे भारताचे नवीन उच्चभ्रू आहेत.
• 2006-07 मध्ये त्यांच्या पहिल्या कादंबरी ‘दि अॅकेमी ऑफ डिजायर’ ने “ले प्रिक्स मिले पेजेस” हा पुरस्कार जिंकला.
• 2009 मध्ये बिझनेसवीक मासिकाने तरुण तेजपालला त्या वर्षाच्या भारताच्या 50 सर्वात सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत नाव दिलं.
• 2010 मध्ये तेजपाल यांना आंतरराष्ट्रीय प्रेस संस्थेच्या इंडिया चॅप्टर अंतर्गत “अवॉर्ड फॉर एक्सीलेंस इन जर्नलिज्म” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.