पुरामुळे ३७४ घरांची हानी; ८६ शेतकऱ्यांना फटका

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोली: तालुक्यावर कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे एकूण ३७४ घरांचे मिळून एकूण १ कोटी २८ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, ८६ शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होऊन १५ लाख रुपयांची हानी झाली आहे. डिचोलीचे मामलेदार आणि विभागीय कृषी कार्यालयाने याचा अहवाल नुकताच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
हेही वाचाः १.५७ लाख जणांचा पहिला डोस बाकी
अतिवृष्टी व पुराचा तालुक्यातील अनेक गावांतील घरांना जबर फटका बसला. याचा पाहणी अहवाल स्थानिक तलाठ्यांच्या मदतीने मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी तयार केला आहे. तसेच डिचोली विभागीय कृषी अधिकारी नीलिमा गावस यांनी शेतांची पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. हे दोन्ही अहवाल उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पुरात सुमारे ४० लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते तर १,७३५ लोकांना पुराचा फटका बसला होता, असेही तलाठ्यांच्या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ ऑगस्टपर्यंत सर्व पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांना या कालमर्यादेत मदत पोहोचेल, अशी ग्वाही मामलेदार पंडित यांनी दिली आहे.
हेही वाचाः आमदार प्रसाद गांवकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
नुकसान झालेल्या घरांचा अहवाल
गाव | घरांची संख्या |
आमोणा | १०१ |
डिचोली | ४ |
कारापूर | १४ |
कुडणे | ४ |
हरवळे | १५ |
लाटंबार्से | १ |
मये | १ |
नार्वे | २ |
न्हावेली | ९ |
पाळी | ५२ |
पिळगाव | १९ |
साळ | ४९ |
साखळी | २९ |
सुर्ला | ७४ |
एकूण | ३७४ |
हेही वाचाः गोवा खाण महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख लोकांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पष्ट रोडमॅप तयार करा
पूरग्रस्त भागांत यंत्रणांची धावपळ
– अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक भागांत केळी, बागायती तसेच काजू व भात पिकाची हानी झालेली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यात जाऊन पाहणी करून अहवाल तयार केला आहे.
– सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण त्यासाठी अर्ज करताना दस्तावेज जोडण्याची अट घातली आहे, त्यातील अनेकांचे दस्तावेज वाहून गेल्याने अडचण उभी राहिली आहे.
– पुरानंतर संबंधित भागांत साथीचे रोग पसरू नयेत, याची खबरदारी आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. संबंधित भागांत औषध फवारणी गोळ्या वाटप सुरू आहे.
हेही वाचाः आनंदाची बातमी : यावर्षी कला अकादमीच्या भजन स्पर्धा होणार !
पीडितांच्या पुनर्वसनाची हमी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी साखळी मतदारसंघातील तळे, तोरल, मल्लिकार्जुन मंदिर, भामई, सेंट जोसेफ चर्च तसेच उसगाव आदी पूरग्रस्त भागांची पाहणी करून घरे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची हमी दिली. जे घडले ते खूपच वेदनादायी असून अनेकांचा संसार उघड्यावर पडल्याचे प्रत्यक्ष पाहून मन हेलावले, असेही ते म्हणाले.