पुरामुळे धारबांदोड्यात दोन कोटींचं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी
धारबांदोडा: नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे तालुक्याला सुमारे दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील शेती, बागायतींना फटका बसून कृषी विभागाचे सुमारे ६१ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. पुराचा सर्वाधिक फटका तालुक्यातील कुळे, दाभाळ, दावकोण आणि साकोर्डा भागाला बसला आहे.
हेही वाचाः आसगाव, हणजूण येथे ड्रग्ज जप्त
सुमारे दोन कोटी रुपयांचं नुकसान
धारबांदोडा तालुक्याचे मामलेदार कौशिक देसाई यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती देताना सांगितलं की, पुराचं पाणी घरात घुसणं, ट्रक पाण्याखाली जाणं, घराचा भाग किरकोळ प्रमाणात कोसळणं यासारखे प्रकार घडले आहेत. ग्रामीण भागातील काही मातीच्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं त्या घरांच्या भिंती धोकादायक बनल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेचं आणि खासगी मालमत्तेचं झालेलं नुकसान पहाता सुमारे दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचाः फोडाफोडीला सुरुवात! भाजपच्या माजी मंत्र्यांचा आपमध्ये प्रवेश
शेती आणि बागायतींचं सुमारे ६१ लाख रुपयांचं नुकसान
तालुक्यातील शेती आणि बागायतींचं सुमारे ६१ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, असं धारबांदोडा विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत यांनी सांगितलं. यात भात शेती, बागायती आणि बांधकामांचा समावेश आहे. शिगाव, कुळे तसंच दाभाळ, साकोर्डा भागात बागायतीची आणि शेतीची मोठी हानी झाली आहे. बानसायवाडा शिगाव येथील शेतकरी प्रकाश देसाई यांच्या बागायतीचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचाः मूर्तीमंत चैतन्य… ज्ञानाचा खजिना ‘भाई खलप’
पूरग्रस्तांना सामाजिक संस्थांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मदत
सध्या अनेक घरांमध्ये चिखल साचला असला, तरी या पुरातून अनेक कुटुंबांनी सावरण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. पूरग्रस्तांना सामाजिक संस्थांकडून आणि कार्यकर्त्यांकडून आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली जात आहे.