तिळारीला महापूर ; डिचोली, पेडणेत घुसले पाणी !

साळ, इब्रामपूर, पेडणे, हसापूर गावांना पाण्याचा वेढा

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : दोडामार्गमध्ये रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने अखेर जी भीती होती तेच झाले. तिळारीने धोक्याची पातळी ओलांडली असून आता पुराचे पाणी थेट साटेली भेडशी, आवाडे, भेडशी बाजारपेठेत घुसू लागले आहे. तिळारी नदीच्या पुराचा गोवा राज्यातील डिचोली व पेडणे तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. साळ गावात 8 ते 10 फूट पुराचे पाणी आले आहे तर इब्रामपूर, पेडणे, हसापूर गावांना पुराचा वेढा पडला आहे. शेती बागायतींचं मोठं नुकसान झालंय.

पहाटे 3 च्या सुमारास पाणी वाढल्याने एकच गोंधळ उडाला. भिकाजी गणपत्ये यांच्या पायरीपर्यंत नदीचं पाणी पाणी पोहचल असून काहींची घरे ही पाण्यात जाणार असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, आत प्रशासनही सजग झाले असून दोडामार्ग तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार यांनी संभाव्य परिस्थितीनुसार तिळारीत एनडीआरएफ टीमला पाचारण केल्याची माहिती ‘गोवनवार्ता लाईव्ह’ ला दिली आहे.

दोडामार्ग तिळारी राज्यमार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. तिळारीशीही तालुका यंत्रणेचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पहाटेपासून प्रशासन सुद्धा आता पुरस्थिती हाताळण्यासाठी कामाला लागले आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण असून साटेली भेडशी येथील भिकाजी गणपत्ये यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पुरस्थिती नियंत्रणात सांगणाऱ्या प्रशासनाचा आत्मविश्वास नडला असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

मुसळधार पावसामुळं तिलारीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याची पातळी वाढतेच आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जमेची बाजू म्हणजे पहाटे आता पावसाचा जोर मात्र काही अंशी ओसरला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!