पुराचा धोका वाढला! अंजुणे धरणाचे चारही दरवाजे उघडले

Goan Varta Live | प्रतिनिधी
साखळी: मुसळधार पावसामुळे उत्तर गोव्यातील तालुक्यांमध्ये आधीच जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे आता साखळीलाही पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अंजुणे धरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अंजुणे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ नोंदवण्यात आली होती. दरम्यान, आता अंजुणे धरणाच्या चारही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
हेही वाचाः पेडण्यात घरात शिरलं पाणी; शेतीला आलं नदीचं स्वरूप
१९ जुलैलाच दिलेला इशारा
१९ जुलै रोजी अंजुणे धरणाच्या पाणी पातळीवरुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. जलस्त्रोत खात्याने केरी, मोर्ले, पर्ये आणि कारापूर- सर्वण पंचायतीला सतर्कतेचा इशारा दिला होता. १९ जुलै रोजी देण्यात आलेल्या इशाऱ्याप्रमाणे कोणत्याही क्षणी अंजुणे धरणांमधून पाणी सोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, गेल्या ७२ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अखेर अंजुणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
धरणातील पाण्याची पातळी वाढली
अंजुणे धरणाची पाणी पातळी वाढल्यानं धरणातून पाणी सोडण्यात आलंय. हे पाणी प्रामुख्याने कष्टी आणि वाळवंटी नदीत सोडले जाते. या नद्यांच्या ओहीटीवेळी हे पाणी सोडले जात असले तरी या नद्यांची अचानक पातळी वाढण्याचा धोका लक्षात घेता स्थानिक लोकांनी दक्षता घ्यावी, असंही सांगण्यात आलंय. या नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी, असा इशाराही जलस्त्रोत खात्याने दिलाय. १९ जुलैलाच अंजुणे धरण हे ८६.९१ मीटरपर्यंत भरलं होतं. दरम्यान, ८९.६० मीटरपर्यंत धरणात पाणी साठवले जाते.
आता साखळीला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता
सत्तरी, डिचोली, पेडणेसोबतच आता साखळीला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर आधीच खबरदारी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी रेड अलर्टप्रमाणे मुसळधार पाऊस झाला होता. तर शुक्रवार, शनिवारीही राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असल्याचं दिसून आलंय. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळालाय.